येरवडा: गणपती विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर वाढदिवस साजरा करण्यासाठी येण्यास नकार देणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने डोक्यात लोखंडी हत्याराने वार करुन, भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात देखील टोळक्याने कोयत्याने वार केले. तसेच या घटनेत एका महिलेला देखील मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा भागातील गणेशोत्सव मंडळांची सोमवारी रात्री विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर आरोपी सिद्धांत गुंजाळ हा आकाश कुसाळे याच्या घरी आला. आशिष धोत्रे याचा वाढदिवस आहे, तो साजरा करण्यासाठी येण्यासाठी आकाशला चल म्हणाला. पण मी थकलो आहे, येत नाही असे उत्तर आकाशने दिल्याने त्याचा राग मनात धरुन आरोपी गुंजाळेने लोखंडी हत्याराने आकाशच्या डोक्यात वार केले.
आकाश याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होवू लागल्याने त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या नीलम शेलार आणि त्यांचा मुलगा रोहन हे भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आले. यावेळी आरोपी गुंजाळ याने रोहन शेलार याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला देखील गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींच्या टोळक्याने दोन्ही जखमी तरुणांना आणि नीलम शेलार या महिलेला मारहाण केली. तसेच बघून घेण्याची धमकी देखील दिली. या घटनेची माहिती येरवडा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.