पिंपरीः शहरात एकीकडे सारेजण गणेशोत्सवाच्या जल्लोषात असताना येथे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन एकाची झोपतेच धारधार शस्त्राने गळा चिरुन खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बावधन परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, प्रवीण महतो(वय २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बावधन चौकीजवळील एका नर्सरीमध्ये प्रवीण याचा धारदार शस्त्राने झोपेत असतानाच गळा चिरून खून करण्यात आला. या घटनेची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी राजीवकुमार महतो आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. राजीवकुमार महतो याला त्याच्या पत्नीसोबत प्रवीण याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून त्याने त्याच्या एका साथीदारासोबत प्रवीण यास ठार करण्याचे ठरविले. त्यानुसार प्रवीण हा झोपेत असतानाच त्याचा गळा चिरून खून करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.