शिक्रापूरः शेरखान शेख
लग्नासाठी मुली भेटत नसल्याने अनेकजण लग्न ठरवून देणाऱ्या वेगवेगळ्या संस्था व वधू वर सूचक केंद्राचा पर्याय स्विकारतान दिसत आहे. मात्र, अशाच एका संस्थेच्या नावाचा वापर करुन अनेकांकडून पैसे उकाळल्याच्या तक्रारी संस्थेला प्राप्त झाल्या असून, अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. पुणे जिल्हातील माहेर संस्थेच्या नावाने लग्नासाठी मुली देतो, असे भासवून अनेकांकडून पैसे उकळल्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी फिरताहेत बनावट पदाधिकारी
शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे माहेर नावाची एक संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून अनेक अनाथ मुला मुलींचा सांभाळ करुन त्यांना स्वावलंबी करुन अनेकांचे विवाह करण्याचे काम संस्थेने केले आहे. आतापर्यंत संस्थेच्या वतीने २०० मुलामुलींचे विवाह करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागात याच संस्थेच्या नावाचा वापर करीत अनेकजण फिरत असून, संस्थेचे पदाधिकारी असल्याचे सांगून आम्ही मुलांचे लग्न करुन देत असल्याचे भासवून अनेकांकडून हजारो रुपये घेत आहेत.
त्याबाबत काही तक्रारी देखील माहेर संस्थेकडे प्राप्त झाल्या आहेत. यामुळे याबाबत माहेर संस्थेच्या वतीने शिक्रापूर पोलिसांकडे काही पुराव्यांसह तक्रार देण्यात आली आहे. मात्र, माहेर संस्थेच्या वतीने कोणत्याही मुला मुलींचे विवाह करुन देताना कोणत्याची स्वरुपाची रक्कम स्विकारली जात नसून नागरिकांनी लग्नासाठी मुलगी शोधत असताना कोठेही आपली फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच कोणाच्याही अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन व अध्यक्षा हिराबेगम मुल्ला यांनी केले आहे.