पुणेः शहराला एक खूप मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून, देशातील विविध भागातून तसेच परदेशातून देखील विद्यार्थ्यी पुण्यात शिक्षण घेण्यासाठी येत असतात. खऱ्या अर्थाने शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख पुण्याची आहे, परंतु रविवारी किंबहुना त्या आधी देखील घडलेल्या घटनांमुळे शहरात गुन्हेगारीविश्व डोकं वर काढत असल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत चाललेले आहे. मग प्रश्न असा उपस्थित राहतो की, खाकीची भीती राहिली उरली आहे का? या घटनांमध्ये तरुणांचा सक्रिय सहभाग असल्याने शहर या घटनेने हादरून गेले आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास एका टोळक्याने माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करुन निर्घूपणे हत्या केल्याची घटना घडली. या घटनेत सख्या बहिणेने वनराज यांच्या जुन्या भांडणातून काटा काढल्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या दिवशी आंदेकर यांची हत्या झाली, त्याच दिवशी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बँक फायनान्स कंपनीच्या मालकाची देखील शुल्लक कारणावर हत्या करण्यात आली. धनकवडी परिसरात एका टोळक्याने दोघा तरुणांवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. रविवारी एकाच रात्रीत घडलेल्या या घटनांवरून शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
शहरात गुंड टोळ्यांकडून क्षुल्लक कारणांवरून कोयत्याने हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. धनकवडीत पंचवटी सोसायटीजवळ गुंड टोळक्याने एका तरुणासह त्याच्या मित्रावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. हडपसर परिसरात उत्कर्ष सोसायटीजवळ फायनान्स कंपनीतील कर्मचारी वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय ४७, रा. हडपसर) रात्री साडेदहाच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी अल्पवयीन मुलाने त्यांना मोबाईल हॉटस्पॉटचे कनेक्शन मागितले. त्यांनी नकार दिल्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादामधून त्यांची अल्पवयीन मुलासह साथीदारांनी कुलकर्णी यांच्यावर हत्याराने वार करून खून केला.
पुण्याला आणखी एका घटनेने हादरवून सोडले होते. ते म्हणजे खराडीजवळ नदीपात्रात एका महिलेचे शीर मिळून आले होते. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. या घटनेचे गांभीर्य पोलिसांनी ओळखून तपासाची चक्रे वेगवान दिशेने फिरवली. त्यामधून जे समोर आले ते पाहून पोलीस देखील चक्रावून गेले. ज्या महिलेचे शीर मिळून आले होते. ती महिला मूळची पुण्याच्या शिवाजीनगर भागात राहणारी होती. तिच्या नावावर त्या ठिकाणी एक दहाबायदहाची खोली आहे. ती खोली आपल्या नावावर करावी, अशी मागणी मयत महिलेच्या भावाकडून करण्यात येत होती. त्या गोष्टीचा सतत तगादा बहिणेकडे तो करीत होता. पण बहिणीने यास साफ नकार दिल्यानंतर झालेल्या वादामधून त्याने बहिणीची हत्या केली व तिच्या शरिराचे तुकडे करुन नदीपात्रात फेकून दिले. या घटेमुळे देखील मोठी खळबळ उडाली होती. याशिवाय, चंदन चोरट्यांकडून शस्त्राचा धाक दाखवून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना घडत आहेत. डेक्कन, डहाणूकर कॉलनी आणि कॅम्प परिसरातील पूना क्लबमधून चोरट्यांनी चंदनाची झाडे चोरून नेल्याच्या घटना घडल्या. तसेच चोरट्यांकडून महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावण्याच्या घटना देखील घडत आहेत. पादचाऱ्यांना मारहाण करून मोबाईल चोरी, रोकड लुबाडण्यात येत आहे. त्यामुळे शहरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गणेशोत्सवामुळे खबरदारी घेणे गरजेचे
शहरात गुन्हेगारी वाढत असून, यावर रोख लावण्यासाठी पोलिसांवर मोठी जबाबदारी असणार आहे. येत्या काही दिवसांत गणेशोत्सव आहे, त्यामुळे शहरात एक प्रकारचे आनंदाचे वातावरण असणार आहे. या काळात कोणाताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून अधिक खबरदारी घेण्याची गरज असणार आहे.