नदी पात्रात कचरा टाकण्याचे वाढले प्रमाण,नदी प्रदूषण मोठी समस्या
भोर -पुणे महामार्गावरील हरतळी(ता.खंडाळा) येथील पुलावर नदीच्या पाण्यात वाहून आलेल्या कच-याचा , प्लास्टिक बाटल्यांचा, मद्याच्या बाटल्यांचा ढिगारा साचला असुन पुलाच्या रस्त्यावर वाहुन खडी,वाळु,माती साचली आहे.संबधित विभागाकडून साफसफाई सुरू असून पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने पूलाच्या कठड्याला मोठ्या प्रमाणात बाटल्यांचा कचऱ्यांचा ढिगारा तरंगत साचून राहिला आहे. त्यामुळे परिसरात कच-याची दुर्गंधी पसरली आहे.
मागील दोन दिवसापासून तालुक्यात दोन्ही भाटघर व नीरा देवघर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने या धरणांतून मोठा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे त्यामुळे दोन्ही नद्या दुथडी भरून वाहल्याने सांगवी जवळील व हारतळी येथील पूलाला मोठे पाणी आले आहे. प्रशासनही संबंधित पुलांबाबत वेळोवेळी खबरदारी घेत आहे .परंतु पावसाचा जोर मोठा असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होतच आहे. हरतळी येथील पुलाचे संरक्षित कठडे काही ठिकाणी तुटल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. तसेच या रस्त्याचे काम सुरू असल्याने जागोजागी रस्ता जलमय खड्डे, चिखल,निसरडा बनला आहे. वाहनचालकांनी रस्त्यावरून जाताना येताना सावकाश, सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नदी प्रदूषणात वाढ. या भागातील नदी लगत असणाऱ्या गावातुन ,पर्यटक,येणारे जाणारे प्रवासी यांचे नदीपात्रात नदीच्या बाजूला कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असून नदी प्रदूषणाचा धोका वाढत चालला आहे .तसेच नदीच्या हद्दीलगत असणाऱ्या मोकळ्या जागेत मद्यपींचे , पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या काचेच्या मोकळ्या बाटल्या असा मोठा पाऊस झाल्यावर नदीच्या हद्दीतून पाण्यात वाहून जात आहे. नदी किनारी,नदी पात्रात होणारे प्रदुषण ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.
अजूनही पावसाचा जोर कायम असुन पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून मुसळधार पावसात नागरिकांनी काळजी घ्यावी सुरक्षित रहावे असे आवाहन प्रशासनाने केली आहे