पारगांव: धनाजी ताकवणे
चौफुला-केडगाव महामार्गावर गुरुवारी (दि. २२) रात्री ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एका दुचाकीस्वार युवकाला जीव गमवावा लागला असल्याची घटना घडली आहे. हा अपघात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. नितीन गोपाल पटेल (वय ३७ रा. चौफुला ता. दौंड) असे अपघातात ठार झालेल्या चौफुला येथील व्यापाऱ्याचे नाव आहे. ते गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास केडगावकडून चौफुल्याकडे येत होते. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टाकलेल्या मुरमाच्या ढिगाऱ्याला दुचाकी धडकून पटेल सिमेंट रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.
सध्या चौफुला केडगाव रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. अपघात झालेल्या ठिकाणी दोन्ही लेनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चौफुला लेनवर वाहतूक सुरू आहे. तर केडगावकडे जाणाऱ्या लेनवर ठेकेदाराने मुरमाचे ढिगारे टाकले आहेत. आठवडा झाला तरी हे ढिगारे रस्त्यात पडून आहेत. या काळात ढिगाऱ्यांना धडकून पाच दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. ढिगाऱ्यांजवळ कुठलेही परावर्तक किंवा फलक लावलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्यावेळी समोरून जास्त उजेडाचे वाहन आल्यास दुचाकीस्वारांना हे ढिगारे दिसत नाहीत. त्यात सध्या पावसाचे वातावरण असल्याने हे मळकट ढिगारे दिसून येत नाहीत. स्थानिकांनी गेल्या आठ दिवसांपासून ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांना ढिगारे हटविण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी याबाबत काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे नितीन पटेल यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.