ओढे ,नाले,भात खाचरे तुडुंब, पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस,ताशी ४०ते ५० किमी वेगाने बरसणार पाऊस – हवामान खात्याचा इशारा
भोर तालुक्यातील भाटघरसह,नीरा देवघर धरण परिसरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने शुक्रवार (दि.२३) सायंकाळ पासुन पावसाचा जोर वाढला व रात्रीपासून दुसऱ्या दिवशी आजही दुपारपर्यंत पावसाने हाहाकार माजवला. यावेळी भाटघर धरणातून शनिवार दि.२४ रोजी दुपारी दोन च्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने २४,६७१ ने नीरा नदी पात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे तर , सायंकाळी पाच वाजता नीरा देवघर धरणातून २,४७५ ने नदी पात्रात विसर्ग करण्यात आला आहे . या पावसाचा जोर मोठा असल्याने धरण परिसरातील भात खाचरे , नदीच्या ताली ,पाण्याने तुडुंब भरून गेल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढेही अठ्ठेचाळीस तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याच्या विभागाने दिला आहे.
धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आणि सुरक्षित राहण्याचा इशारा दिला आहे. भात पिकाला सदर बरसणारा पाऊस जरी अनुकूल असला, तरी कडधान्य पिकांचे मात्र या तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवसात पुणे जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचे संकेत दिले आहे . त्यामुळे भोर तालुक्यातील शेतकरी वर्ग होणाऱ्या अतिवृष्टी,पावसाला कंटाळलेला असुन दुर्गम भागात अतिवृष्टीला शेतकरी अतिशय त्रासुन गेला आहे.
भारतीय हवामान विभागाने पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताक् वर्तवली असुन ताशी ४० ते ५० वेगाने पाऊस बरसणार असल्याचे सांगितले आहे तरी नागरिकांनी सतर्क राहावे असे मंत्रालय नियंत्रण कक्ष मुंबई येथुन सांगण्यात आले आहे.