भोरः भाग १
तालुक्यातील गेल्या ३२ वर्षांपासून औद्योगिक वसाहत (MIDC) चा प्रश्न रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. यामुळे रोजगाराच्या अभावी तालुक्यातील युवा वर्गावर वणवण भटकत राहण्याची वेळ आली आहे. शिरवळ, पुणे, मुंबई या ठिकाणी विस्थापित झालेला युवावर्ग कामाच्या शोधात जात आहे. अशी अवस्था इथल्या तरुणांची झालेली आहे. कित्येक वर्षांपासून कोणताही नवीन प्रकल्प, कारखाना येथे येऊ शकला नाही. भाटघर, निरा देवधर, गुंजवणी आणि वीर या चार धरणांतून हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. बळीराजा देशोधडीला लागला तरी अनेक वर्षांपासून शेतीसाठी शास्वत पाणी पुरवठा नाही. उपसासिंचन योजना अपूर्णवस्थेत आहे.
गेली कित्येक वर्षे भोर तालुक्यांतील युवकांसाठी कोणत्याही प्रकारचे क्रीडा संकुल नाही. क्रिडांगणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत कित्येक वर्षे शिवसृष्टी उभारण्यात आली नाही. या सारखी दुर्दैवाची बाब नाही. कित्येक वर्षे भ्रष्टाचार, हुकुमशाही कारभार असल्याने तालुक्यातील सहकारी संस्था बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे सहकारातून एकेकाळी लाखो रुपये दुध उत्पादक, शेतकरी वर्गाच्या हातात यायचे ते बंद झाले आहे. तालुक्यातील कोणत्याही भागात जावा अत्यंत निकृष्ट दर्जाचे रस्ते पहायला मिळतात. त्यामुळे भोर तालुका पर्यटनासाठी आजही मागासलेल्या अवस्थेत आहे.
कित्येक वर्षे भोर तालुक्यातील ऐतिहासिक मंदिरे आजही अत्यंत असुविधा असणारी व दळणवळणाच्या दृष्टीने अयोग्य रस्ते असल्याने कोणत्याही प्रकारचे विकास आराखडे तयार करण्यात आले नाहीत. म्हणून पर्यटन विकास होत नाही. तालुक्यातील बसस्थानकात राडारोडा, चिखल, अस्वच्छता आदींनी ग्रासलेले आहे.( या कामी मोठ्या प्रमाणार निधी मंजूर झाला असून कामाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे हा प्रश्न सुटेल असे वाटते.) भोर डेपोला प्रवासी वर्गाच्यासाठी नवीन चांगल्या प्रकारच्या गाड्या आलेल्या नाहीत.
तालुक्यात नियोजनशुन्य, दुरदृष्टी नसल्याने इच्छा शक्ती नसल्याने व जनतेला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारे पुढारी जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतः ची तुंबडी भरून काढण्यासाठी व्यस्त असल्याने आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या पिचलेल्या जनतेच्या हितासाठी व जिवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे भोर तालुक्यातील बळीराजा, युवा, महिलावर्ग आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या व पिचलेल्या अवस्थेमध्ये आहे. असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
क्रमश….