सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल,
आपणास खूप मोठा पल्ला गाठायचा आहेः खा. सुप्रिया सुळे
पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे
बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार आणि राज्यात होत असलेल्या मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुण्यातील रेल्वे स्टेशन परिसरात तोंडावर काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. यावेळी शरद पवार उपस्थित होते. पाऊस सुरु असताना मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. भर पावसात बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, मोठ्या आंदोलनाची ही फक्त सुरुवात आहे, आपणास सुरक्षितेसाठी मोठे काम करायचे आहे. कोणत्याही कार्यकर्त्याने त्या मुलींच्या घरी जाऊ नये. त्यांची ओळख बाहेर देऊ नये असे आवाहन सुळे यांनी केले.
आपण महाराष्ट्रातील मुलींच्या सुरक्षेसाठी कामाला लागू या. तसेच जोपर्यंत त्या व्यक्तीला फाशी होत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही. बदलापूर आंदोलनात बाहेरची लोक होती, असे सत्ताधारी म्हणत होते, मात्र बाहेरचे लोक असले तरी घटनेचा निषेध महत्वाचा आहे. असे सुळे म्हणाल्या. शरद पवार यांनी राज्यातील घटना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला दिला. त्याचबरोबर उपस्थितांना एक शपथ घ्यायला लावली. महिलांवर कधीही अत्याचार करणार नाही, करू देणार नाही अशा आशयाची ही शपथ होती. यावेळी मविआचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.