ई-सेवा केंद्र, झेरॉक्सवाले जोमात तर बहिणींची मात्र तारांबळ
भोर – महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना” मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेचा शुभारंभ झाला असुन अनेक महिलांच्या, माता -बहिणींच्या खात्यात सरकारने सांगितल्या प्रमाणे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी काही महिलांच्या बॅंक खात्यात पैसे आले. परंतु सरकारचा योजना शुभारंभ जाहीर कार्यक्रम असणाऱ्या दिवशी म्हणजेच १७ तारखेला पहाटे सकाळ पासुनच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने महिलांच्या आनंदाचे वातावरण पसरले आहे तर ज्यांना पैसे आले नाहीत अशा असंख्य महिलांनी बॅंकेकडे धाव घेतली आहे . त्यामुळे भोरला तालुक्यातुन ग्रामीण भागातील गावागावांतुन महिलांचा सर्वच बॅंकेत लोंढा दिसुन आला. लाडक्या बहिणींची बॅंकेत आधार कार्ड लिंक, मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी धडपड दिसुन आली.
लाडक्या बहिणीचा अर्ज भरताना बॅंक खात्यास आधार कार्ड लिंक आहे की नाही असा पर्याय होता सर्वांनी होय म्हणून अर्ज भरल्यानंतर ज्यांचे आधारकार्ड, मोबाईल नंबर लिंक आहे व सर्व अर्जातील मजकूर बरोबर भरला आहे फोटोसह आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केले आहे.ॲपरोव्हड, सबमिट असा मेसेज आला आहे अशा सर्वांना पैसे जमा होत आहेत. ज्या महिलांची जुनी बँकेचे खाते आधार कार्ड ला लिंक आहेत अशा काही महिलांच्या जुन्या खात्यातूनही पैसे घेण्याचे चित्र दिसले आहे .अर्जात बँक वेगळी परंतु जमा होतान मात्र पैसे भलत्याच जून्या खात्यात जमा झाले आहेत.त्यामुळे महिला पुरत्या हैराण झाल्या आहेत. काही महिला तर खात्यातील पैसे पुन्हा परत जातील या भीतीने बँकेत मोठ्या प्रमाणात जाऊ लागल्याने बँकेत गर्दीच गर्दी झाली आहे. ३१ ऑगस्ट ही योजनेची शेवटची तारीख असुनही ही योजना लवकर बंद होती की काय? या भीतीने महिलावर्ग दिवसरात्र शहराकडे सेवा केंद्र व बॅंकेत धाव घेत आहेत.
अशिक्षित महिलांचा संभ्रम कायम व गोंधळलेल्या स्थितीत
अशिक्षित महिलांचा मात्र या योजनेने पुरता गोंधळ उडून गेला आहे पैसे न जमा झाल्याने लिंक असलेले आधार कार्ड,मोबाईल नंबर वारंवार घेऊन बँकेत हेलपाटे मारत आहेत. बँकेचे कर्मचाऱ्यांकडुन योग्य माहिती मिळुनही महिलांना समजावून सांगून सुद्धा महिला पुन्हा पुन्हा बॅंकेत चकरा मारत आहेत त्यामुळे बँकेत गर्दीच गर्दी होत आहे. काही महा-ई-सेवा केंद्रांवरून मोबाईल नंबर, आधार कार्ड लिंक , बॅंक खाती एकमेकांना लिंक असुनही अपडेटच्या नावाखाली महिलांकडून पैसे उकळण्याचे चित्र चालू आहे.