पुणेः ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी प्रस्तावन सभेचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संविधान प्रस्तावनेचे वाचन करुन संविधानाचे तत्वे आणि मूल्यांच्या संरक्षणाकरिता प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच अजित पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व खासदार, आमदार, कार्यकर्ते आदींनी संविधान सभेचे नेतृत्व करुन संविधानाच्या रक्षणासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली. राज्यभरातील पक्षाच्या कार्यालयाच्या येथे हिंदी व मराठी भाषेमध्ये संविधान प्रस्तावनेचे मोठे मोठे फलक लावण्यात आले होते. पुण्यामध्ये देखील अजित पवार यांनी संविधान सभेत या मोहिमेचे नेतृत्व करीत आपल्या कटिबध्तेचा पुनरुच्चार केला.
राष्ट्रवादी महायुतीचा भाग असून, धर्मनिरपेक्ष पुरोगामी आणि सर्वसामावेशक पक्ष आहे. महायुती सरकारचा आम्ही भाग असताना मुस्लिम, दलित आदिवासी यांच्यासाठी कोणताही भेदभाव न करीता विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार
या ऐतिहासिक मोहिमेद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटनात्मक मूल्ये आणि सामाजिक न्याय प्रति असलेली अतूट बांधिलकी अधोरेखित करण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राज्यघटनेची आणि बहुलतावादी मूल्यांची खरी रक्षक असल्याचे संदेश देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे देखील पवारांनी यावेळी सांगितले. तसेच ३५ लाख महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला ३००० रुपयांचा हप्ता जमा झाला असल्याचे सांगत १७ तारखेपर्यंत १.२५ कोटी महिलांना याचा लाभ होईल, असे म्हटले.