भोर: येथील प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या कुटुंबाकडून सुनेचा मानसिक व शारिरिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सहा जणांविरोधात गोरेगांव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणातील कोणालीही अद्यापर्यंत अटक केलेली नाही.
गोरेगांव पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृपा कुलदीप गुजर (वय ३२, मूळ रा. गोरेगांव, ता. माणगांव, सध्या रा. मंगळवार पेठ, भोर, जि. पुणे) यांचा विवाह भोर येथील कुलदीप अनिल गुजर यांच्याशी झाला होता. विवाह झाल्यापासून पती कुलदीप गुजर आणि त्याच्या घरचे कृपा यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत होते, असे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. तसेच तिच्या दोन लहान मुलींना देखील कृपा यांच्यापासून दूर ठेवले जात होते. सासऱ्याचा छळ असह्य झाल्यामुळे कृपा या माहेरी म्हणजेच गोरेगांव येथे आल्या आणि त्यांनी गोरेगांव पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पीडितेच्या फिर्यादानुसार गोरेगांव पोलिसांनी पती कुलदीप अनिल गुजर, तिचे चुलत सासरे सुनिल चिमणलाल गुजर, राजेश चिमणलाल गुजर, चुलत सासू पोर्णिमा राजेश गुजर, दीर मयूर सुनिल गुजर आणि जाऊ प्रणिता मयुर गुजर (सर्व रा. ११८, मंगळवार पेठ, भोर, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्यापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी आणि गोरेगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस हवालदार वाय. आर. चव्हाण हे करीत आहेत.
- चौकशी झाली पण अद्याप अटक नाही?
गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर भोर या ठिकाणी येऊन पोलिसांनी चौकशी केली. परंतु कौटुंबिक हिंसाचार होऊन देखील अद्याप सदर कुटुंबास अटक करण्यात आली नाही. तर बड्या हस्तीने हस्तक्षेप करून प्रकरण दाबल्याची चर्चा मात्र भोर शहरासह परिसरात रंगू लागली आहे.