भोर: तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी, गटार, कचरा आणि आरोग्याचा प्रश्न तसेच महत्त्वाचा असलेला रोजगाराचा प्रश्न व औद्योगीकरण ऐरणीवर आहे. असे असताना आता लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहे.महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या नेत्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.
निवडणुकीत मतांसाठी या प्रश्नाचे भांडवल करणारे नेते याबाबत पुन्हा निवडणुकीला सामोरे जात नागरिकांची मतदारांची दिशाभूल करीत आहेत. तालुक्यात आतापर्यंत नेते उमेदवार यांचे दौरे झाले; मात्र या प्रश्नांकडे त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही तर नागरिकांनी व त्यांच्या नेत्यांनी त्यांना तसे निदर्शनास आणून दिले नसल्याने यावेळीही मतांच्या राजकारणात तालुक्याचे अनेक प्रश्न प्रलंबितच राहणार आहेत, असे सध्याचे चित्र आहे.
भोर तालुका हा प्रकल्पग्रस्त तालुका म्हणून उदयास आला आहे.तालुक्यातील अनेक भागात पाणी वीज, आरोग्य गटार रस्ते आणि कचरा प्रश्न गंभीर बनत चालले आहेत. वर्षानुवर्षे असेच सुरु आहे. तसेच तालुक्यातील या प्रश्नावर बोलण्या पेक्षा एक मेकावर टीका टिपनी करण्यातच वेळ घालवत असून तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्नावर पडदा टाकण्याचे काम आताच्या नेते मंडळींकडून तालुक्यात सुरू आहे.एक मेकाची उनी धूनी काढून मतदार राज्याला वेड्यात कडण्याचा कारभार मात्र चांगला हाती घेतला आहे.
निवडणुकांमागून निवडणुका येत आहेत. नेते, मंत्री आश्वासने देत आहेत; मात्र प्रत्यक्षात हे प्रश्न सुटत नाहीत. भोर तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे; मात्र पाणी, आरोग्य, कचरा हे दैनंदिन जीवनातील प्रश्न अद्यापही सुटले नाहीत. राजकारणात एकमेकाला शह काटशह देताना अनेक गावांत पाणीयोजना झाल्या; मात्र ऐन उन्हळ्यात त्या गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. मग या कोट्यवधी रुपयांच्या योजनांवरील खर्च पाण्यातच गेला आहे.
योजना करताना त्याचे नियोजन झाले नाही, केवळ ठेकेदारांचे भले झाले आहे. बोगस आणि निकृष्ट कामे झाल्याने अनेक गावे तहानलेली राहिली आहेत. तालुक्यात अनेक गावात काँक्रीटचे रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे मात्र गटाराचे नियोजन पाणी योजनेचे नियोजन नसल्याने काँक्रीटचे रस्ते फोडण्याची वेळ येणार आहे. रस्ते करताना रस्त्याच्या दोन्ही बाजू भरल्या जात नाहीत. पाणी लाइन तोडल्या त्या जोडल्या जात नाहीत. गटार व्यवस्थापन पाहिलं जात नाही. त्यामुळे भविष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.
पाणीप्रश्न सुटेना
वर्षानुवर्षे शहरातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. अनेकांनी पत्रकार परिषदा घेत पाणी देण्याचे श्रेय घेतले. सर्वसामान्य नागरिक मात्र पाण्यासाठी झगडत आहे. विकतचे पाणी घेणे त्याच्या नशिबी आले आले आहे. तालुक्याच्या विकासासाठी आता अनेक उमेदवार सरसावले आहेत. तालुक्यातील विकासाच्या आड येणारे अनेक नेते मंडळी महायुती व महविकास आघाडी करून एक झाली असल्याने त्यांच्याकडून संबंधित प्रश्न तरी सुटावेत याच अपेक्षा आहेत.
शहराला पाणी पुरवठा कधी होणार यासाठी आतापर्यंत कोणतेच ठोस निर्णय होत नाही. अधिकारी वर्ग प्रत्यनशील आहे परंतु वरिष्ठ पातळीवरून निर्णय होत नाहीत राजकारण आडवे येत असल्याने तालुक्यातील अनेक भागातील पाणी प्रश्न सुटण्यास उशीर होत आहे.
केवळ आश्वासनांची खैरात
पाणी योजना प्रशासकीय इमारत गटार योजना यामध्ये राजकारण झाले.अनेकांच्या राजकीय संघर्षामुळे विकास कामे रखडली होती.विकास कामात अडथळे येणार नाहीत, अशी ग्वाही देत आहेत; मात्र ते मनाने एकत्र आहेत की केवळ निवडणुकीतील मते घेण्यासाठी असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले आहेत. तर दोन्ही नेत्यांकडून बैठका घेत तालुक्यातील प्रश्न निवडणुकीनंतर सोडवण्याची आश्वासने मात्र दिली जात आहेत.
औद्योगीकरण करणार हे मात्र बोलण्यातच..
भोर तालुक्यातील औद्योगीकरण प्रश्न नेहमीच भेडसावत असतो. प्रत्येक पंचवार्षिक निवडणूक लागल्या की भोर तालुक्यासाठी औद्योगिकीकरण करणार व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार हे मात्र ठरलेलं असतं परंतु हे आता फक्त नावापुरतच आणि बोलण्यापुरतच असेल याकडे कोणाचंच लक्ष नाही.