भोर तालुक्यातील बारे बुद्रुक येथे रविवार (दि.१३) पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस बळीराजासाठी देत सामाजिक उपक्रम राबवत भात पीकाची लागवड केली . शेतीतील पारंपरिक व आधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी भात लागवड करण्याबरोबर, झाडांच्या रोपांची लागवड केली आणि शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील इतरही पिकांच्या मशागतींबाबतची माहिती करून घेतली.
बारे बुद्रुक (ता.भोर) येथील दशरथ सिताराम दानवले यांच्या भात खाचरात भाताच्या रोपांची लागवड सुरू असताना या विद्यार्थ्यांनी भात लावणी करण्यासाठी खाचरात उतरून भाताच्या रोपांची काढणी, बांधणी, रोपांची वाहतूक, खाचरात चिखल करताना बैलांच्या पाठीमागून फिरणे , त्यासाठी औत उचलून मदत करणे, मशागत करणे , जपानी पध्दतीने भाताच्या रोपांची सरळ रेषेत लागवड, खाचरात बांध घालून पाणी साठवण्याची पद्धत अशी वेगवेगळी कामे केलीत. त्यासाठी विद्यार्थ्यांना सुनिल दानवले यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एस बोरमाने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. नाना शेजवळ यांच्यासह १४ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते .भात लावणीच्या वेळी शेताच्या बांधावर बसून भाजी भाकरी खाण्याची अनोखी मजा विद्यार्थ्यांनी अनुभवली.
भात लावणी करताना ती एखाद्या अन्नसाखळीप्रमाणे असल्याने प्रत्येक विद्यार्थी त्या साखळीत सहभागी झाला.
यावेळी महाविद्यालयातील शिवाजी माने ,भक्ती घाडगे ,साक्षी विभुते ,शुभम गोरे, प्रज्वलित ससाने , ओमकार चव्हाण , श्रीनाथ वाटणवर , श्रेया बोडा , दीक्षा बुधवणकर , सूर्या शिंदे
ऋतिक वाळुंजकर , स्वप्निल पवार , किरण तोंडचोरे , प्रतिक दानवले हे राष्ट्रीय सेवेचे विद्यार्थी उपस्थित होते.