भोर प्रतिनिधी – कुंदन झांजले
आज गुरुवार दि.१० रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा भोर आगाराची भोर भानुसदरा भोर एमएच ४० एन ९४६१ ही एसटी बस किवत गावच्या हद्दीतील गुजर यांच्या घरासमोर समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना पावसामुळे खराब झालेल्या पट्टीवरून घसरून गटारात खचल्याची घटना घडली . रात्रीची वेळ असल्याने या बसमध्ये चालक व वाहक हे दोघेजण होते. दोघाजणांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले असे किवतचेग्रामपंचायत सदस्य अक्षय चव्हाण यांनी सांगितले .
मिळालेल्या माहितीनुसार सदरची एसटी ही महुडेवरून भोरकडे निघाली होती . रात्रीची वेळ असल्याने भोरकडे येणारे कोणतेही प्रवासी एसटी बस मध्ये नव्हते. समोरून येणाऱ्या वाहनाला साईट देताना साईटपट्टीवरून ही एसटी बस गटारात गेली.. यावेळी बसमध्ये चालक व वाहक सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. मात्र एसटी बसचे नुकसान झाले आहे .
काल दिवसा आणि आज रात्री सलग दोन दिवशी एसटी बस गटारात जाणाऱ्या घटना घडल्याने पुन्हा एकदा रस्त्याच्या साईट पट्टींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .स्थानिकांकडून सांगितलेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून साईट पट्टी व रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत तात्पुरती मलमपट्टी करत आहे परंतु रस्त्यावर एखादा मोठा खड्डा चुकविताना छोटे वाहन हे मोठ्या वाहनाच्या समोर येऊन पटकन बाजूला होत आहे त्यामुळे त्या वाहनाला बाजूला साईट देताना मोठी वाहने रस्ता अरुंद असल्याने व साईट पट्टी भरावाची नसल्याने गटारात पलटी होत आहे संबंधित प्रशासनाने रस्त्यांचे रुंदीकरण, रस्त्यावरील खड्डे ,साईट पट्ट्या मोठ्या भरावाच्या कराव्यात अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.