स्व.माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या स्मृतिदिनी विविध उपक्रम
भोर – नगरीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष दिवंगत स्वर्गीय अमृतलाल रावळ यांच्या अकराव्या स्मृतिदिना निमित्त शर : प्रभा विकास प्रतिष्ठानच्या वतीने समाजातील आदर्श एकल मातांचा सन्मान बुधवार (दि.२५) करण्यात आला. माजी नगरसेविका लक्ष्मीबाई दळवी, सेवानिवृत्त शिक्षिका शैलजा लोहोकरे, द्रौपदा नलावडे, अलका घोडके, शीला कंक, मीना भेलके, सुमन डवरी, संगीता दुधाणे, संगीता जाधव, सीमा घोणे आणि सुलाबाई पिलाणे यांचा आदर्श एकल माता म्हणून सन्मान करण्यात आला. भोर येथील श्रीमंत सौ.गंगुताई साहेब पंतसचिव वाचनालयाच्या सभागृहात कैलासबेन रावळ यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, महिला अध्यक्षा भारती शेवाळे, युवती जिल्हाध्यक्षा दुर्गा चोरगे, तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, माजी सभापती वंदना धुमाळ, प्रतिष्ठानचे सचिव विजय रावळ, माजी नगरसेविका राजश्री रावळ, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, तृप्ती किरवे, डॉ.सुरेश गोरेगावकर, डॉ.प्रदीप पाटील, ॲड जयश्री शिंदे व रावळ कुटुंबीय व सन्मानार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ.सुरेश गोरेगावकर यांनी स्व.रावळ यांच्या निष्ठेचा आदर्श समाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी घ्यावा असे सांगितले. जुन्या रूढी परंपरांना फाटा देत एकल मातांचा सन्मान करून रावळ कुटुंबियांनी समाजासमोर सकारात्मकतेचा एक आदर्श ठेवला असल्याचे मत भारती शेवाळे यांनी व्यक्त केले. दुर्गा चोरगे यांनी आदर्श एकल मातांच्या रूपाने समाजातील रणरागिणींच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान होत असल्याचे मत व्यक्त केले. सन्मानार्थी माजी नगरसेविका श्रीमती लक्ष्मीबाई दळवी यांनी आपल्या मनोगतातून स्व.रावळ यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाप्रसंगी भोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रमोद गुजर यांनी स्व.रावळ यांच्या अकराव्या स्मृतिदिनी अकरा गरीब व गरजू विद्यार्थी त्यांच्या शिक्षणासाठी दत्तक घेत असल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी कैलासबेन रावळ यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे विठ्ठल शिंदे यांनी प्रस्ताविक व स्वागत केले पार्थ रावळ यांनी आभार मानले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष ढवळे यांनी केले.