पारगांव: धनाजी ताकवणे
गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यातील अनेक भागांत बिबट्याचे मनुष्यावार होणारे हल्ले वाढताना दिसत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एक लहान मुलगा आणि ऊस तोड कामगार महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला करून जीवे मारल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडालेली आहे. यामुळे येथील भागात राहणाऱ्या नागरिकांत मोठी दहशत निर्माण झाली असून वनविभागावर रोष व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्यांसह जंगली प्राण्यांना पकडण्यासाठी टास्क फोर्स अन् पिंजरे लावावेत अशी मागणी राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दौंड तालुक्यातील नरभक्षक बिबट्यांचे हिंसक प्रकार दिवसेंदिवस वाढत असून यावर नागरिकांच्या सुरक्षेबाबत तातडीने खबरदारी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवन, मुंबई येथील कार्यालयात दौंडचे आमदार राहुल कुल यांनी भेट घेतली. दौंड तालुक्यात बिबट्याचा मानवीवस्तीत वाढलेला वावर थांबविण्यासाठी टास्क फोर्स तयार करणे, बिबट्या व तत्सम जंगली प्राण्यांना पकडण्यासाठी आवश्यक ठिकाणी पिंजरे लावावेत व मौजे कडेठाण, ता. दौंड, जि. पुणे येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या स्व. लताबाई बबन धावडे यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. यावर कार्यवाहीचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
महिलेला आर्थिक मदत मिळावीः कुल यांची मागणी
गेल्या काही दिवसांपूर्वी दौंड तालुक्यातील कडेठाण (ता. दौंड ) येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या स्व.लताबाई बबन धावडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठीचे निवेदन दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले आहे.