सारोळे: सातारा-पुणे महामार्गावर मांढरदेवीला दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघाताची घटना शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सव्वा अकराच्या सुमारास सातारा-पुणे महामार्गावरील सारोळेनजिक घडली आहे. या घटनेत उत्तम झेंडे (वय अंदाजे ५५ वर्ष, रा. वडकी, ता. हवेली) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या अशा अपघाती जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झेंडे कुटुंबीय मांढरदेवीच्या दर्शनासाठी २ गाड्यांसह वाई रस्त्याने निघालेले होते. पुणे-सातारा महामार्गावर सारोळे गावच्या हद्दीतील हॅाटेल मल्हार समोर त्यातील एका गाडीचा टायर पंक्चर झाला. यावेळी मृत उत्तम झेंडे हे दुसऱ्या गाडीतून पुढे निघून गेले होते. टायर पंक्चर झाल्याचा फोन त्यांना आला. त्यानंतर ते गाडीसह त्या दिशेने निघाले. रस्ता ओलांडत असताना पलीकडे असलेल्या साताराकडून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की या दुर्घटनेत झेंडे यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस, महामार्ग पोलीस व आर. टी. ओ. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. राजगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी भोर उपविभागीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.