जेजुरीः आषाढी वारीचे औचित्य साधत महाराष्ट्रातील सिनेमागृहांत डंका हरिनामाचा हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. सिनेमा विठ्ठलाची अपार भक्ती करणाऱ्या वारकऱ्यांबद्दल असून, सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जेजुरी येथील श्री स्वामी समर्थ चित्रमंदीरात पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथील श्री माऊली बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्थेतील तब्बल १२० विद्यार्थ्यांना हा सिनेमा दाखविण्यात आला. कलाशिक्षिका नवनी संदिप इनामके यांच्या मार्फत या खास शोचे आयोजन करण्यात आले होते.
सिनेमाचा आनंद बालवारकऱ्यांनी सिनेमागृहात घेतला. सिनेमाला अजय-अतुल यांचे संगीत लाभल्याने एक प्रकारची उर्जा सिनेमाला मिळालेली आहे. सिनेमा पाहत असताना सिनेमागृहात टाळ्यांचा कडकडाट पाहिला मिळाला. बालवारकऱ्यांनी पुरेपुर आनंद या सिनेमाचा घेतल्याचे पाहिला मिळाले. यातील अनेकजणांनी सिनेमा संपल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत सिनेमाला भरभरून शुभेच्छादेखील दिल्या. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड या शिक्षण संस्थेच्या – न्यू शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल, सासवड या ठिकाणी नुकत्याच चित्रकला शिक्षक म्हणून रूजू झालेल्या सासवडच्या कलाशिक्षिका नवनी संदीप इनामके यांनी स्वखर्चाने स्व: इच्छेने हा सिनेमा मुलांना मोफत दाखविला. तसेच पहिलं मानधन विठूरायाला समर्मित असल्याचे त्यांनी सांगितले.
“आषाढी वारीच्या निमित्ताने अनेकजण अन्नदान, आरोग्यसेवा वस्त्रदान, वारकऱ्यांसाठी राहण्याची सोय आदी सेवा दिली जाते. नुकतीच मी न्यू शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल, सासवड या ठिकाणी चित्रकला शिक्षक म्हणून रूजू झाले. माझे पहिलेच वेतन मला मिळाले. यासाठी आपण काहीतरी करावे, या हेतूने डंका हरिनामाचा हा सिनेमा या मुलांना मोफत दाखविला. तो त्यांनी आनंद व्यक्त करीत पाहिला. याचे आत्मिक समाधान मला मिळाले.”
-कला शिक्षिका नवनी इनामके
यावेळी या सिनेमाचे कलादिग्दर्शक संदिप इनामके, शिल्पकार सागर तळेकर, शिक्षक संतोष इनामके, कलाकार नवनाथ भोंगळे, बालकलाकार नवदीप इनामके, प्रगतशील शेतकरी तुकाराम इनामके, उद्योजक अमोल इनामके, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती म्हेत्रे, स्नेहल इनामके याचप्रमाणे सासवड आणि जेजुरीतील ग्रामस्थ उपस्थित होते. युवा कीर्तनकार ह. भ. प. स्वप्नील महाराज काळाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोडी येथील त्यांच्या संस्थेमध्ये विद्यार्थी विद्यार्थीनींना संस्कार शिबीर, प्रवचन भजन, किर्तन, अध्यात्माचे धडे शिकविले जातात. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थीनीं या संस्थेत वारकरी सांप्रदायिक शिक्षणाचे धडे घेतात. त्यांनीदेखील शुभेच्छा देत आयोजकांचे आभार मानले.