नसरापूर: नैसर्गिक प्रवाहामध्ये शेण मिश्रित पाणी मिसळल्यामुळे वेळू येथील जुने जाई वाडकरवाडी या वस्त्यांमधील नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत तसेच बोरवेल व विहिरीमधील पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे सुमारे ५०० ते ६०० नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.पिण्याच्या पाण्याचा व डासांचा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाला आहे लोक साथीच्या आजारांनी आजारी पडत आहेत
या दूषित पाण्याच्या प्रश्नामुळे वेळूतील शेतकरी व स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून, या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये येत्या आठ दिवसांमध्ये पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
वेळोवेळी सांगूनही कोणतही दखल घेतली गेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे
शिंदे मळा या परिसरामध्ये एका अग्रो नावाच दीडशे दोनशे जनावरांचा गोठा आहे. गेली चार वर्षांपासून या गोठ्यातील शेण मिश्रित पाणी व इतर सांडपाणी हे त्या भागातून वाहणाऱ्या ओढ्यामध्ये येऊन संबंधित ओढा प्रदूषित झाला आहे. त्यामुळे तेथून खाली वस्ती असणाऱ्या नागरिकांच्या विहिरी व बोरवेललाही शेण मिश्रित पाण्याचा वास येतो आहे. या प्रकरणी संबंधित गोठा मालकाला वेळोवेळी याबाबतची माहिती देऊनही संबंधित गोठा मालक कुठल्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
….अन्यथा आंदोलन छेडणार
त्यामुळे स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचबरोबर हे पाणी खालील बंधाऱ्यांमध्ये साचल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. यामुळे येथील प्रत्येक घरांमध्ये डेंगू, चिकनगुण्याचे रुग्ण आढळून येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी देली आहे. त्यामुळे तात्काळ वरील गोठा मालकाला समज देऊन आपल्या सांडपाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा स्थानिक तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
पंचक्रोशीतील स्वच्छ व सुंदर असा नैसर्गिक ओढा म्हणून या परिसरातील ओढ्याची ओळख आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासून फुलचंद चाटे यांनी यश अग्रो नावाने शिंदेमळा या ठिकाणी चालू केल्यामुळे ओढ्यामध्ये शेण व गोमूत्र सोडले जात आहे. त्यामुळे या ओढा प्रदूषित झाला असल्याची आरोप नागरिक करीत आहेत त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, याची व्यवस्था तात्काळ ग्रामपंचायतीने व प्रशासनाने करावी अन्यथा स्थानिक नागरिक म्हणून आम्ही सर्व ग्रामपंचायत समोर आंदोलनास बसणार आहोत.
शिवाजी वाडकर स्थानिक शेतकरी
सदर जागेची आम्ही स्थळ पाहणी केली असून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच त्यामध्ये सोडण्यात आलेले मलमूत्र हे मागील वर्षीचे असून यावेळी कोणतेही मलमूत्र सोडण्यात आले नाहीत.
सुरेश पांगारे सरपंच वेळू