भोरः राज्यात नामनिर्देश अर्ज भरणे आणि त्याची छाननी करण्याची वेळ आता संपुष्टात आल्याने केवळ या प्रक्रियेतला एक महत्वाचा टप्पा बाकी राहिलेला आहे. तो म्हणजे भरलेला अर्ज माघारी घेण्याचा, यासाठी ४ नोव्हेंबरची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. या चार दिवसांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. भोर विधानसभा निवडणुकीसाठी कुलदीप कोंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आणि अपक्ष लढणार या भूमिकेवर ते ठाम आहेत. यामुळे या मतदार संघातील लढत तिरंगी होणार असल्याचे दिसत आहेत. या रंगददार तिरंगी लढतीकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
कोंडे अपक्ष लढण्यावर ठाम..!
भोर विधानसभेसाठी आघाडीकडून संग्राम थोपटे हेच निवडणुकीचे प्रमुख दावेदार असतील असे सांगण्यात आले आणि ठरल्या प्रमाणे काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली. यामुळे या पक्षात कोणीही बंडखोरी केली नाही. मात्र, महायुतीमध्ये ऐनवेळी आयत केलेल्या उमेदवाराला संधी दिल्याने युतीमधील अनेकांनी बंडखोरीचे निशान फडवले. युतीमध्ये अनेकजण निवडणूक लढण्साठी इच्छुक होते. परंतु, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून शंकर मांडेकर यांचे नाव आल्याने सगळ्यांचा धक्का बसला. शिवसेनेला जागा सुटून कुलदीप कोंडे यांना युतीकडून उमेदवारी मिळेल अशी शक्यता असताना प्रत्यक्षात मात्र वेगळेच घडले. यामुळे कुलदीप कोंडे यांनी अपक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
तिरंगी लढतीची चर्चा
मतदार संघातील सध्याचे वातावरण पाहता संग्राम थोपटे, शंकर मांडेकर आणि कुलदीप कोंडे अशी तिरंगी लढत होणार असल्याची दाट शक्यता असून, याचा फटका मतविभाजनामध्ये होऊ शकतो असे राजकीय जाणकार सांगत आहेत. सोशल मीडियावर तिरंगी लढतीच्या मोठ्या प्रमाणावर चर्चा झडू लागल्या आहेत. तिन्ही उमेदवारांना पसंती मिळत असून, कोणा एकाकडे कल आहे असे म्हणणे उचित होणार नाही. ४ तारेखेनंतर चित्र अधिकर स्पष्ट होऊन नेमका मतदारांचा कौल कोणाकडे आहे, हे सांगणे सोइस्कर होईल.
२३ नोव्हेंबरला फैसला
या विधानसभा मतदार संघात ४ लाख १२ हजार ४१४ मतदार आहेत. यापैकी स्त्री मतदारांची संख्या १ लाख ९३ हजार ६९, तर पुरुष २ लाख १९ हजार ३३१ आहेत. तृतीयपंथी चार तर दिव्यांग मतदारांची संख्या ५ हजार ३८२ इतकी आहे. भोर तालुक्यापेक्षा मुळशी तालुक्यातील मतदारांची संख्या ३० ते ४० हजारांनी वाढलेली आहे. या मतदार संघातील वेल्हा (राजगड) तालुका हा दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. यामुळे होऊ घातलेल्या भोर विधानसभा निवडणुकीत कोणाला फटका बसणार आणि २३ नोव्हेंबरला कोणाच्या माथी विजयाचा गुलाल लागणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.