जेजुरीः पुरंदर विधानसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण? यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झडू लागल्या आहेत. अनेकांची नावे देखील घेतली जात आहे. मात्र, युतीच्या संभाव्य उमेदवारांपैकी एक नाव म्हणजे विजय शिवतारे यांचे. त्यांना उमेदावारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा केली जात असताना माध्यमांमध्ये शिवतारे हे भाजपतर्फे निवडणूक लढणार असल्याची बातमी प्रसारित करण्यात आली आहे. या बातमीवर स्वःताह विजय शिवतारे यांनी खुलासा केला असून, यामध्ये तथ्य नसल्याचे सांगितले आहे. तसेच भाजपतर्फे निवडणूक लढवणार असल्याची बातमी खोटी असून, कोणीही अशा अफवांवरती विश्वासू ठेवू नये, असे आवाहन विजय शिवतारे यांनी केले आहे.
दैनिक लोकशाही मुंबई, या वृत्तपत्राने मी भाजप या पक्षाकडून निवडणूक लढणार असल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आल्याचे समजले. हे वृत्त पूर्णपणे खोटे आणि निराधार आहे. मी उद्या माझा उमेदवारी अर्ज दाखल करीत असून, मी शिवसेना पक्षाचा उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज भरणार आहे. तसेच याप्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि सदाभाऊ खोत यांना देखील निमंत्रित केले असल्याची माहिती शिवतारे यांनी दिली आहे.
युतीचे उमेदावर विजय शिवतारे?
सदर बातमीचे स्पष्टीकरण देताना विजय शिवतारे यांनी लोकशाही वाहिनीने दिलेली बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी उद्या २८ अॅाक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे अजूनही युतीकडून उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसताना शिवतारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असे सांगितले आहे. तसेच शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचा उल्लेख त्यांनी प्रसारित केलेल्या पत्रात केला आहे. त्यांच्या या वाक्यामुळे तेच युतीचे उमेदवार असतील अशी शक्यता अधिक दिसत आहे. मात्र, युतीकडून अधिकृत नावाची घोषणा झाल्यावरच त्यावर बोलणे अधिक सोयिस्कर होईल.