दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जयघोषात तल्लीन होऊन सर्वत्र दत्त जयंती साजरी
” दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” या गजरात शेकडो भाविकांच्या गर्दीने फुललेल्या दत्त मंदिरातुन भोर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातून सर्वत्र दत्त जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. भोर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बसरापुरच्या आनंदा वाडीतील दत्त मंदिरात रांगोळीच्या रूपात साक्षात विठ्ठल अवतरले आहेत. श्री दत्त पारायण,काकडा आरती,भजन , अभिषेक,होम ,हवन , सत्यनारायण महापूजा, दत्त जन्म सोहळा, प्रवचन , महाप्रसाद, किर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन,जागर असे विविध कार्यक्रम झाले.
या गावातील श्री दत्त भक्त चंद्रकांत दिलीप झांजले यांनी दोन तासांच्या अथक परिश्रमाने विविध सप्त रंगानी विठ्ठलाची रांगोळी काढण्यात आली. हुबेहूब विठ्ठलाची प्रतिकृती रांगोळी मंदिर परिसरात काढल्याने येथे साक्षात विठ्ठल अवतरले असे येणा-या भाविकांनी कौतुक करत सांगितले.अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व किर्तन सोहळा झाल्यावर भक्ती झांजले व तिचे वडील चंद्रकांत झांजले या बाप लेकीने समाज प्रबोधनपर एकपात्री भारूड भजन करत अनेक श्रोत्यांची मने जिंकली. दत्तकृपा सेवा मंडळ आनंदावाडी यांचे हे २४ वे वर्षे असुन पुढील २५ व्या वर्षात पदार्पण करताना मंदिर जिर्णोद्धार करणार आहोत त्यासाठी भाविकांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन दत्त मंदिराचे सेवेकरी दत्तात्रय पवार, सौरभ तानाजी झांजले, शिवाजी झांजले, मोहन पवार,रोहन पवार,अनिकेत झांजले, प्रदिप झांजले, प्रविण झांजले यांनी केले आहे.