भोरः आदिवासी कृती समिती महाराष्ट्र, पुणे तसेच हुतात्मा नाग्या महादू कातकरी आदिवासी समाज संघटना महाराष्ट्र राज्य, पुणे विभाग यांच्या वतीने तालुक्यातील कातकरी आदिवासी समाजातील विद्यार्थांना जातींच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम अनंतराव थोपटे कॅालेज येथे पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.
मेळाव्याला मोठ्या संख्येने कातकरी आदिवासी समाजातील महिला भगिनी उपस्थित होत्या. यावेळी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते जातींच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी थोपटे यांनी या समाजातील बांधवांना ते राहत असलेल्या जागीच्या सातबाऱ्यावर त्यांच्या नावाची नोंद करण्यात यावी, ही प्रमुख मागणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला भोरचे उपविभागीय अधिकारी डॅा. विकास खरात, तहसिलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे, प्रकल्प अधिकारी घोडेगाव प्रदिप देसाई, पोलीस निरीक्षक अण्णा पवार, सामाजिक कार्यकर्ते संतोष केळकर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आनंदराव आंबवले, सामाजिक कार्यकर्ते अनिल सावले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी तालुक्यात विविध ठिकाणी या समाजाचे कार्यक्रम होत आहेत. तसेच मेळाव्याचे देखील आयोजन केले जात आहे. हा समाज दिवसभर भटकंती करणारा समाज आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी हा समाज काबाडकष्ट करीत असतो. मुळशी तालुक्यात कातकरी समाजाची संख्या अधिक असून, त्यानंतर भोर आणि वेल्हा (राजगड) मध्ये असल्याचे थोपटे यांनी सांगितले.
कातकरी समाजातील बांधवांना हक्काचे घर मिळाले पाहिजेः आ. संग्राम थोपटे
या समाजातील बांधवांना राहण्यासाठी त्यांचे हक्काचे घर मिळायला पाहिजे. तालुक्यात सरकारी जमिनीत राहणाऱ्या कातकरी बांधवांच्या नावाची नोंद सातबाऱ्यामध्ये झाली पाहिजे. तसेच खाजगी जागेत राहणाऱ्या समाजातील बांधवांचे पंचनामे करुन सातबाऱ्यावर नोंद करुन त्या सातबारा कागदाचा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात यावा, अशी मागणी थोपटे यांनी यावेळी केली. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या घरकुलचा लाभ या शेवटच्या घटकापर्यंत मिळेल असेही ते यावेळी म्हणाले.