भोर : बारे खुर्द (ता .भोर)येथील काही ठराविक घरांवर रात्रीच्यावेळी कोणीतरी अज्ञात दगडी टाकत असून काही घरांच्या दरवाजाला बाहेरून कड्या घातल्या जात असल्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षितता मिळावी यासाठी ग्रामपंचायत बारे खुर्दच्या वतीने भोरचे तहसिलदार सचिन पाटील व पोलिस निरीक्षक यांना सरपंच सविता गायकवाड, उपसरपंच दिपक खुटवड, सुरेश खुटवड, भारती गायकवाड यांनी निवेदन दिले आहे.
भोर तालुक्यात गेल्या काही दिवसांपुर्वी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत होते. त्याच काळात बारे गावच्या हद्दीतही ड्रोन फिरत होते. दरम्यान २९ जुन रोजी रात्री सुमारे एक वाजता गावात एक अज्ञात चार चाकी गाडी न थांबता फिरुन गेली. त्यानंतर थोड्या वेळात ६ ते ७ अनोळखी व्यक्ती हातामध्ये कोयते घेऊन येवून दोन घराच्या कड्या वाजविल्या, त्यामुळे गावामध्ये आरडा ओरडा झाल्याने ग्रामस्थ जमा झाले. गावातील लोकांना त्यांचा पाठलाग केला परंतू ते रात्रीचे अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. त्यानंतर ग्रामस्थांनी २ तास गस्त घातली होती. परंतु कोणीही आढळून आले नाही. त्यानंतर गावामध्ये दररोज रात्री अकरानंतर घरावर दगड फेक होत होती. त्यानंतर भयभित झालेल्या ग्रामस्थांनी वरील आशेयाचे पत्र २ जुलै रोजी भोर पोलिसांना देण्यात आले होते. मात्र अजूनही ठराविक घरांवर दगडफेक तसेच दरवाजांना कड्या घातल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीनेक्ष सोमवारी तहसिलदार व पोलिस स्टेशनला निवेदन देऊन सुरक्षिततेची मागणी केली आहे. ग्रामीण भागातल्या गावातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे.
बारे गावच्या पोलिस पाटलांना सांगून संपुर्ण गावाची बैठक घेऊन पुढिल निर्णय घेण्यात येईल पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.