शेतकरी हवालदिल, जोमात आलेल्या शेतीपीकांचा प्रश्न ऐरणीवर.
भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्याच्या भाटघर धरण परिसरात चोरांचा सुळसुळाट कायम असुन बारे खुर्द येथील शेतीच्या पाण्यासाठी आवश्यक असणा-या शेतीपंपाच्या (मोटरच्या) केबलची चोरी गुरुवार (१५)रात्री झाल्याची घटना घडली.
बारे खुर्द मधील दत्तनगर(खुटवड वस्ती) येथील शेतकरी शांताराम शंकर खुटवड व इतर खातेदार आणि प्रकाश नारायण खुटवड व इतर यांची शेत जमीन धरण परिसरातील वेळवंडी नदी किनारी आहे. शेतात ज्वारी,गहू, हरभरा अशी रब्बी पीक आहेत.त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची सोय म्हणून त्यांनी शेतीपंप पाण्यात सोडले आहेत. विजेवर चालणाऱ्या या शेतीपंपासाठी अंदाजे ४०० ते ५०० फुट कॉपर (तांब्याची) केबल त्यासाठी लावली होती. हीच केबल चोरट्यांनी गुरूवारी रात्री सोलून, तुकडे करून पळविली.तांबे धातु याला बाजारात चांगली किंमत असल्याने अलिकडील काळात या केबल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. जोमात आलेले पीक पिक दाणे भरत असताना केबल चोरीला गेल्याने मोटर बंद झाल्या आहेत.पाण्यावाचून पीक सुकु लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. चोरीला गेलेली केबल यांची किंमत तीस हजाराच्या आसपास असुन मोठ्या आर्थिक नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी सदर घडलेल्या घटनेची माहिती गावाचे पोलीस पाटील निखिल भालेराव यांना दिली असून त्यांनी पोलीस स्टेशनची संपर्क साधला आहे
मागील वर्षीही याच गावचे शेतकरी अनिल चंदनशिव यांची सातशे फुट विद्युततार केबल चोरीला गेली होती.तसेच मागील महिन्यात पसुरेतील शेतीपंप पाण्यातील मोटरच चोरट्यांनी लंपास केली होती. वेळवंड खो-यासह , तालुक्यात अशा चोरीच्या या घटना वाढल्या असुन पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व गावा गावातुन पोलीस पाटील, पोलीस मित्र यांनाही गस्तीच्या सुचना देण्याचे शेतक-यांकडून सांगण्यात येत आहे.