नसरापूरः नुकतीच ज्यूदो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने बेल्ट ग्रेडेशन यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत योगेश काशिनाथ धाडवे यांच्या कामगिरीची दखल ज्यूदोने घेतली आहे. भारतीय ज्यूदो महासंघाने त्यांना सहाव्यांदा ब्लॅक बेल्ट जाहीर केला आहे. धावडे हे पुण्याचे आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय ज्यूदो फेडरेशनकडे सातव्यांदा यासाठी शिफारस करण्यात आली आहे. विशेष म्हणजे योगेश धाडवे हे भारतीय क्रीडा महासंघामध्ये ऑन डेप्यूटेशन हाय परफार्मन्स मॅनेजर म्हणून कार्यरत असून, पुणे आयकर विभागात इंस्पेक्टर या पदावर कार्यरत आहेत.
ते स्वतः अंतरराष्ट्रीय ज्युदोपटू असून त्यांनी भारताला दक्षिण आशियाई गेम्समध्ये सुवर्ण, तर राष्ट्रकुल स्पर्ध्येत भारताला पहिले रोप्य पदक मिळवून दिले होते. तसेच ते आंतरराष्ट्रीय पंच असून भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून देखील कामकाज पाहत आहेत. ज्यूदो फेडरेशन ऑफ इंडियाने गेल्या दोन वर्षांपासून त्यांना खेलो इंडिया महिला लीग स्पर्धेसाठी चेअरमन पदाची प्रमुख जबादारी दिली असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खेलो इंडिया महिलांच्या स्पर्धा यशस्वीपणे पार पडत आहेत. त्यांना महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले सक्रेटरी शैलेश टिळक, दत्ता आफळे व सतीश पहाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या सर्व कामगिरीचे श्रेय त्यांनी आई वडिल, त्यांच्या पत्नी प्राजक्ता धाडवे, तसेच गुरुवर्य कै. संजय गव्हाणे, कै. महेश मते, कै. जयसिंग धाडवे, कै. कृष्णाजी धाडवे, दीपक होले, राजेंद्र गांधी तसेच पुण्यातील प्रशिक्षक व संपूर्ण मित्र परिवाराला जाते, असे त्यांनी यावेळी सांगितले.