महाराष्ट्र : राज्य परिवहन म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. शासनातर्फे प्रत्येक कर्मचाऱ्यास 6,500 रुपयांची मूळ वेतनात वाढ देण्याचा निर्णय झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.
दोनच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थीसाठी राज्यभरात लोक प्रवास करत आहेत. या प्रवासामध्ये संपामुळे मोठा अडथळा निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र आज बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संपही मागे घेण्यात आला.मुख्यमंत्र्यांसोबत एस. टी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक झाली. या बैठकीत हा तोडगा निघाला आहे.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपण या मोठ्या निर्णयानंतर संप मागे घेण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना करत आहोत असं सांगितलं.
लहान लहान केससाठी अनेक कर्मचारी घरी बसलेले आहेत, त्यांची चौकशी करुन कामावर घेण्याचं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. या निर्णयासाठी 2020 पासूनचा आतापर्यंतच्या फरकाची रक्कम म्हणजे अॅरिअर्सही टप्प्याटप्प्याने मिळेल, असं कामगार नेते किरण पावसकर यांनी सांगितलं.
तोट्यातली एसटी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC ही संस्था एसटीचा कारभार चालवते. ही एक स्वतंत्र संस्था आहे जिला सरकार काही प्रमाणात अनुदान देतं आणि इतर पैसा ती स्वतः उभी करते.
एसटीची तिकीटं, गाड्या भाड्यावर देणं यातून एसटीला उत्पन्न मिळतं. सरकारचे परिवहन मंत्री हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष असतात.
गेल्या काही वर्षांपासून एसटी तोट्यात आहे आणि कोव्हिड काळात लॉकडाऊन दरम्यान वाहतूक पूर्ण बंद असल्याने मार्च 2020 ते मार्च 2021 या काळात एसटीचं 6300 कोटींचं उत्पन्न बुडलं. या काळात कर्मचाऱ्यांचे पगारही थकले होते.
तर एसटीचा एकूण संचित तोटा आहे 12500 कोटी. या आर्थिक परिस्थितीमुळे एसटीला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी, गाड्यांच्या इंधनासाठी सरकारकडे मदत मागावी लागते.
महामंडळाच्या आर्थिक चणचणीचे परिणाम
महामंडळाला नव्या गाड्यांची खरेदी करता येत नाही, आणि जुन्या गाड्यांवर ताण येतो. या गाड्यांची देखभाल वेळच्यावेळी करता येत नाही.
गाड्यांना लागणाऱ्या इंधन खरेदीवर आर्थिक तुटवड्याचा परिणाम होतो. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत आणि पैसे नाहीत म्हणून नवीन भरती करता येत नाही. परिणामी कर्मचाऱ्यांवर ताण येतो. अनेक स्थानकं, आगारं यांची दुर्दशा झालेली आहे.
या सगळ्याचा परिणाम एसटीच्या एकूण सेवेवर होतो आणि म्हणूनच एसटी तुलनेने स्वस्त आणि सुरक्षित असली तरी प्रवाशांकडून खासगी बस, वडाप, शेअरिंगवर चालणाऱ्या गाड्यांना पसंती दिली जाते आणि त्याचाही परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होतो.