जेजुरीः गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतीचे निर्माल्य तयार होते. तेच निर्माल्य गणेश विसर्जनावेळी पाण्यामध्ये सोडले जाते. निर्माल्यासोबत प्लास्टिक आणि इतर कचरादेखील पाण्यात गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते.
त्यामुळे पाण्याचे स्रोत असणारे तलाव, विहीर, नदी दूषित होऊन यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते.
यासाठी जलप्रदूषण होऊ नये आणि त्यातून आरोग्यास हाणी पोहोचू नये, म्हणून नगरपालिका प्रशासनाने निर्माल्य गाडी शहरात फिरवून निर्माल्य जमा करावे, असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते रसिक जोशी यांनी जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांच्याकडे दिले आहे. तसेच जेजुरी शहरातील नागरिकांनी व गणेश मंडळांनी निर्माल्य गाडीमध्येच जमा करावे, असे आवाहन देखील सामाजिक कार्यकर्ते रसिक जोशी यांनी केले आहे.