भोरः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न्हावी येथे आजी आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधत शाळेतील विद्यार्थ्यी आपल्या आजी आजोबांना शाळेत घेऊन आले होते. ज्या आजी आजोबांचे पाल्य शाळेत नव्हते, त्यांनीही शाळेत कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. यावेळी शाळेतील सर्वच शिक्षकांनी आजी-आजोबांचा कुटुंबातील महिमा व कुटुंबातील स्थान याबाबत महती सांगितली.
या कार्यक्रमात प्रत्येक विध्यार्थ्याने आजी आजोबांचे पूजन करुन पुष्पवृष्टी केली. तसेच आजी आजोबांना कडकडून आलिंगन दिले. त्यांना वंदन केले. याप्रसंगी अनेक नातवांडे आणि आजी-आजोबांना गहिवरुन आले होते. उपस्थितांना कंठ दाटून आला होता, तो क्षण अविस्मरणीय ठरला व नाते घट्ट करणारा होता.
जे अशिक्षित आजी आजोबा होते, त्यांची नोंदणी करून त्यांना साक्षरता कार्यक्रमात जोडून त्यांना साक्षर करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक हे प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी आजी-आजोबा यांना लवकरच वह्या व शैक्षणिक साहित्याच्या वाटप करण्यात येणार आहे. आजी-आजोबा संगीत खुर्ची, चमचा लिंबू यांसारखे मनोरंजक खेळ खेळलेच, पण गाण्याच्या तालावर त्यांनी ठेका धरला होता. शिक्षक मुलांनी संधी सोडली नाही, याचा मनसोक्त आनंद घेतला.
यावेळी महादेवआप्पा सोनवणे, गुलाबकाका सोनवणे, संपतकाका सोनवणे यांनी आपल्या मनोगतात कुटुंब, शाळा, समाज यांच्या संस्कारातून अध्यात्मातून विद्यार्थी कसा घडतो, याचा जीवनप्रवास उलघडून सांगितला. तसेच आजी-आजोबांचे कुटुंबातील स्थान किती अढळ आहे ते विशेष केले.
कार्यक्रमानंतर आजी-आजोबा, विध्यार्थी उपस्थित सर्वांना महेंद्र मोहन सोनवणे उर्फ पिंटूनाना सोनवणे यांच्याकडून सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमासाठी गणेश सोनवणे, भरत भोसले, दिपक सोनवणे, अविनाश भोसले, अनिकेत भोसले, प्रविण सोनवणे, गणेश सोनवणे आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन संदिप मोरे, अनिल चाचर, रुपाली पिसाळ, पूनम सोनवणे, सोनाली बोन्द्रे, उर्मिला भूतकर, गीतांजली पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.