राजगुरुनगर: सध्या राज्यात अनेक ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटनेच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच आता राजगुरुनगरमधून २४ वर्षीय तरुणाने पाच वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २४ वर्षीय नराधम आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, विजय बाळु ताठोड उर्फ गोल्या असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड पोलीस ठाण्यात त्याच्यावर बाल लैंगिक आत्याचार अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राजगुरूनगर गावच्या हद्दीत आरोपी विजय बाळु ताठोड उर्फ गोल्या राहत्या घरासमोर फिर्यादी यांचा मुलगा खेळत होता. यावेळी तुला खावु देतो, असे आमिष दाखवून त्याच्या घरात नेऊन त्याने मुलावर जबरदस्तीने आत्याचाराचे कृत्य केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल राजे करीत आहेत.