शिवचरित्र तरुणाईसाठी प्रेरणा।
भोर: शिवचरित्र तरुणाईसाठी प्रेरणास्त्रोत आहे कारण शिवजन्मापूर्वी जर आपण डोकवून पाहिलं तर आपल्यालाच कळेल की काय होती आपल्या महाराष्ट्राची दिशा आणि दश्या.
येथील जनतेचे अमानुषपणे हाल सुरु होते, देवळे उध्दवस्त केली जात होती, शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेलं पिक क्षणार्धात जमिनदोस्त केलं जात होत.. आयाबहिणीची अब्रू लुटली जात होती, तरणी बांड पोर आपल्या बापा समोर उचलुन नेली जायची पण कोणाची हिम्मत नव्हती त्यांना अडवायची . जंगली जनावरे आणि गिधाडांनी हैदोस मांडला होता. संपुर्ण गावच्या गाव उध्वस्त होत होता, होत्याचं नव्ह होतं होत, मृत्यु काय असतो हा जिवंत पणी समोर दिसत होता. जनता हवालदिल झाली होती. मोगल,पोर्तुगीज, फिरंगी हे सर्वच जण जनतेचे हालहाल करत होते.
खुद्द शहाजी राजे हे आपल्या जनतेच हाल पाहत होते. त्यावेळी शहाजी राज्यांचा विवाह लखोजी जाधव यांची कन्या जिजाऊ यांच्याशी झाला.
या दोघांनाही जनते विषय कळवळा वाटायाचा. जनतेला कोणीतरी आ धार देणारा हवा ह्याविषयी सल्ला मसलत व्हायची. पण जर कोणी ह्या गनीमांना आडवा आला तर आपलाच जीव गमवावा लागेल ह्या भीतीने कोणी समोर यायलाच धाजवत नव्हते.
हे सर्व घडत असताना साक्षात पृथ्वीवर ईश्वरी अवतार जन्मावा आणि जनतेच्या जीवनातील सर्व कष्ट आणि अंधकार दुर सारावा अगदी तसचं काहीस झालं.
साडेतिनशे वर्षांपूर्वी फाल्गुन वद्य तृतीया ( १९ फेब्रुवारी १६३०) रोजी आऊसाहेब जिजाऊंना पुत्र प्राप्ती झाली. पुत्र शहाजी राजेंना झाला, पुत्र जिजाऊंना झाला,पुत्र सह्याद्रीला झाला, आणि अखंड महाराष्ट्र झाला, मी अस का म्हणतोय ते आपणांस पुढील लेखन प्रपंचात समजेल।
शिवनेरी किल्यावर शिवरायांचा जन्म झाला. सर्वांना आनंद झाला होता. कारण त्यावेळी शहजी राजे हे पुणे परगाण्याचे जहागीरदार होते.
शिवनेरी किल्ल हा पुणे जिल्ह्यात आहे.
अन मग जिजाऊ आणि शहाजी राजे यांनी ठरवलं कि आपण शिवबांना इथल्या जनतेला आधार देण्यासाठी तयार करू.. सर्वांना एकत्र करु.. अन्यायाविरुद्ध आवज उठवण्यासाठी ताकद देऊ.
मग शिवाबा जसजसे मोठे होत गेले तसे आऊसाहेबांनी शिवबांना रामायण, महाभारततल्या गोष्टी आणि प्रसंग सांगून प्रेरित केले आणि तिच प्रेरणा शिवबाच्या डोळ्यामध्ये दिसत असावी.
फक्त यावरच न थांबता जिजाऊंनी शिबांना राज्याच्या कर्तव्यासोबतच सर्वसामान्य जनतेसोबत मिळूनमिसळून रहायला शिकवले,एकीने मैदाने खेळ खेळणे, गरिबांच्या घरची चटणी भाकर सवंगड्याच्या मांडीला मांडी लावून जमिनीवर बसुन खायची याचे शिक्षण जिजाऊ देतच होत्या पण त्याबरोबर बाल मावळ्यांना एकत्र करुण त्यांना कुस्ती,मल्ल,दांडपट्ट, सोबतच तलवारबाजी, भालाफेक अश्या मैदानी खेळात तरबेज करत होत्या. सर्व जनता हे पाहुन खुप खुशआणि संतुष्ट व्हायची. यातुन अनेक सवंगडी शिवबांना मिळाले.
मग त्याच्या मनामध्ये आपण एकत्र येऊन गनिमांवर कशी मात करु शकतो याची उदाहरणे देऊन त्या सर्व नव्या दमाच्या तरुणांना प्रेरणा देत होत्या.
अस करत करत शिवबा १६ वर्षाचे झाले.
आणि ज्या वयात आमची तरुणाई प्रेमाच्या आणि व्यसनाच्या प्रेमात पडते अश्यावेळी शिवबा आणि त्यांच्या सवंगड्यानी भोर तालुक्यातील श्री क्षेत्र रायरेश्वरच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करुन हे हिंदवी स्वराज्य व्हावे हि तर श्रीं ची इच्छा म्हणून शपथ वाहिली आणि सुरु झाली ह्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची वाटचाल,
आजची तरुणाई जर आपण पाहिली तर १६ वर्षाची मुले मुली मोबाईल, इंस्टाग्राम, युट्यूब , प्रेमप्रकरण, आत्महत्या, समोरच्या व्यक्तीला सन्मान न देणे, हेच करताना क्षणोक्षणी पाहायला मिळते मग असं वाटत की आपणच कुठे तरी कमी पडतोय आपल्या घराला, आपल्या गावाला, आपल्या पिढीला शिवविचार देण्यासाठी. कारण आपण प्रत्येकजण पालक म्हणुन ह्या गोष्टींना आयुष्यात कवडी मोलाची किंमत देत नाही. आपण सगळा ऐशोआराम मिळवण्यासाठी हे कष्ट करतोय. पण संस्कार आणि मार्गदर्शन करण्यात कुठेतरी कमी पडतो आहोत.
प्रत्येकजण कुटुंबासाठी खुप काही करतो आहे. अश्या न्यूनगंडामध्ये अडकून आपण खड्यात चाललो आहोत.प्रेम न मिळाल्याने आत्माहत्या वाढल्या आहेत, व्यसनाधीन पिढी दिवसेंदिवस वाढत आहे.पर्यावरणाचा सुरु असलेला ऱ्हास वाढत चालला आहे.
शिवरायांच्या काळात शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा हिंमत नव्हती. आणि जर लावला तर त्याची गय केली जाणार नाही अस फरमान होत. जर जंगलातील मोठे वृक्ष तोडायचे असतील तर त्या शेतकर्याची परवानगी घ्या,त्याचा योग्य मोबदला द्या आणि सोबत नविन झाडे लावा. अशी शिवरायांची शिकवण आपल्याला शिवचरित्रातून मिळते.
जर सैन्य लढण्यासाठी निघाले तर सैन्याला आदेश असायचा की आपला प्रदेश हा डोंगर दर्याचा प्रदेश आहे. आपण ज्या ठिकाणी मुक्कम कराल त्या ठिकाणी लागणारे अन्न धान्य जीवनावश्याक गोष्टी विकत घ्या. शेतकर्यांना त्याचा मोबदला द्या.
वैरण,गवताच्या गंजी छावणी जवळ असतात, रात्री झोपताना मशाली विजवा किंवा मशाली मुळे कुठे गवताच्या गंजीला आग लागणार नाही आणि त्यामुळे छावणीतील लोकांच्या जीवाच नुकसान होणार नाही यांची काळजी घ्या वैरण जळाली तर जनावराच्या चार्याचा प्रश्न निर्माण होईल. आणि त्या आगीतून वणवा लागला तर वृक्षांचे आणि निसर्गाचे नुकसान होईल.
१०० वर्ष जुने वृक्ष आहेत त्यांचे नुकसान झाले तर परवडणारे नाही. ते पुन्हा तयार होणे नाही.
हे महाराजांनी त्यावेळी आपल्या जनतेला सांगितले आहे मुख्य म्हणजे नुसतेच सांगितले नाही तर त्याचे शासन तयार करुन त्याची अंमलबावणीही जनतेकडून करुन घेतले आहे.
आज आपण पहातोय डोंगरामध्ये वणवा लागला जातोय परंतु आपले सरकार असेल किंवा वनविभाग असेल यांच्या कळून सुयोग्य दखल न घेतल्याने अद्यापही वणव्या पासुन आपल्या डोंगरांची सुटका झाली नाही.
मग आपण शिवचरित्रातून काय शिकलो.
शिवरायांनी आयाबहिणींची अब्रू लुटणार्या राज्यातील पाटलाचा चौरंग केला आणि त्याला चौकात बसवला कारण यापुढे आया बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेततून पहिल त्या सर्वांचा राज्याचा पाटील होईल. पण आजही माझ्या महाराष्ट्रात बलत्कार करणार नराधमाला बेड्या घालुन जेल मध्ये ठेवलं जातय जामिन मिळाला की तर तो बिंधास्त फिरतो आहे.
आपण शिवचरित्राचा आदर्श घेऊन ज्या दिवशी बलात्कार घडेल, ज्या दिवशी तो नराधम सापडेल त्याच दिवशी त्या बलात्काराचा एन्काऊंटर करावा मग तिथून पुढे कोणाची हिंमत नाही होणार अस दुष्कृत्य करायची. परंतु ही वेळ येण्यापुर्वी प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला स्त्री सन्मान कसा करायचा हे शिकवले पाहिजे आणि हे शिकवण्यासाठी शिवचरित्र वाचलं पाहिजे.
शिवरायांचा जयजकार करणं सगळ्यांनाच आवडत पण शिवरायांना अंगीकारण कुणालाच आवडत नाही.
आम्ही आमच्या राजाच्या जयंती दिवशी दाढी वाढवून,चंद्रकोर लावून,गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून,कानात बाळी घालून मिरवतोय डिजे डॉल्बी लावुन नाचतोय, मदिरा पीवून पडतोय. भगवे घेऊन मिरवतोय….
अरे शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा.
आणि ज्या दिवशी आपण हे करू त्या दिवशी नक्की परिवर्तमला सुरुवात नक्की होईल.
आपण स्वतःला मावळे म्हणतो ना मग बावळटागत वागू नका.
ठरवा, निश्चय करा,नियोजन करा, संघ तयार करा,जबाबदारी घ्या,जबाबदारी द्या, आपल्या गावातील तरुणांना तरुणींना एकत्र करा गावकीच्या आणि भावकीच्या राजकारणाला मुठ माती द्या.
एकीने आपल्या गावात अदर्श पिढी घडवण्यासाठी पोलीस भरती ,आर्मी भरती ,शिक्षक ,डाॅॅक्टर , वकील, इंजिनीयर,व्यावसायीक, आ दर्श शेतकरी, चांगला नेता, तयार करण्यासाठी ज्या व्यक्तीमध्ये जी पात्रता आहे त्यानुसार गावमध्ये मार्गदर्शन शिबीरे भरवा.
वाचनालय सुरु करा. ६ ते ८ यावेळेत मोबईल बंद करा.
यावेळ अभ्यास वर्ग घ्या. हे सर्व करताना शिवचरित्राचा आधार घ्या.
कारण शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज या प्रवासात महाराजांना मदत करणारी या मातीतली अठरा पगड आणि बाराबलुतीदार जनता होती.
महाराजांनी मावळ्यांना एकत्र केल प्रत्येकातला गुण ओळखून त्याला ती जबाबदारी दिली. त्याच्या मनामध्ये स्वराज्याची ज्योत पेटवली आणि ती तेवत ठेवली मग त्याततूनच लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हा ध्यास तयार झाला.
ज्या मृत्युला आज तुम्ही आम्ही घाबरतो आहे ना तर त्यावेळी मृत्युला समोरे जायला मावळे घाबरत नव्हते हसत हसत सामोरे जायचे.
तुम्हाला शिवचरित्रातून हिच शिकवण आजच्या पिढीला देण्याची गरज आहे आणि त्या दिवशी परिवर्तन नक्की होईल.
निश्चयाचा महामेरू.
बहुत जनांशी आधारु !
अखंड स्थितीचा निर्धारु. श्रीमंत योगी..!!
जय शिवराय…!!
लेखक
तुषार (भाऊ)साळेकर
(शिवव्याख्याते,समाजप्रबोधक)