भोर: ज्याची निवडून यायची क्षमता तोच, उमेदवार! असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भोर विधानसभेवर दावा करीत जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शक्तीप्रदर्शन करीत शिवसंवाद दौऱ्याला सुरूवात केली. भगवा सप्ताहाच्या माध्यमातून शंकर मांडेकर यांनी भोर वेल्हा तालुक्यात ‘चला लढूयात परिवर्तनासाठी’ असा नारा देत शिव संवाद दौऱ्याला सुरूवात केली. छत्रपती शिवरायांनी ज्या स्वराज्याची शपथ किल्ले रायरेश्वरावर घेतली. त्याच रायरेश्वर किल्ल्यावरून मांडेकर यांनी आपल्या शिवसंवाद दौऱ्याची सुरूवात केली आहे.
यावेळी संपर्क प्रमुख सुनील धाकड, उपजिल्हा प्रमुख संतोष मोहळ, संघटक प्रसाद शिंदे, तालुका प्रमुख हनुमंत कंक, दीपक दामगुडे, सचिन खैरे, युवा सेना जिल्हाधिकारी आदित्य बोरगे, राम गवारे, अनिल पराठे, शरद जाधव, प्रकाश भेगडे, स्वाती ढमाले, शैलेश वालगुडे, सतीश शेलार, दशरथ गोळे, भरत साळुंके आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दौऱ्याच्या माध्यमातून भोर आणि वेल्हा या दोन्ही तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच लोकांचे प्रश्न समजावून घेणार असून, या मतदारसंघात सेनेची ताकद जास्त आहे. त्यामुळे ज्याची निवडून येण्याची क्षमता या सूत्राप्रमाणे आम्ही या मतदारसंघावर दावा करतोय.
– शंकर मांडेकर (जिल्हा संपर्क प्रमुख)
शिवसैनिक संघटन मजबूत करण्यासाठी गावे पिंजून काढणार
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंर राज्यापासून ते गावापर्यंत अनेक राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली. या नव्या समीकरणासोबत अनेकांनी जुळवून घेणे भाग पडले आहे. लोकसभा निवडणुकीत उबाठा पक्षाने भोर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मुळशी, वेल्हा, भोर या तालुक्यांत पक्षाची ताकद दाखवून दिली आहे. यामुळे या भागात उबाठाची ताकद अधिक असल्याचे म्हणत या जागेवर दावा करण्यात आला आहे. याची प्रचिती मांडेकरांनी सुरू केलेल्या शिवसंवाद दौऱ्यावेळी झाल्याचे दिसून आले आहे. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आल्याने याची चर्चा संबंध तालुक्यात होत आहे. दहा दिवसांच्या कालावधीमध्ये भोर, वेल्हा तालुक्यातील गावे शिवसैनिक संघटन मजबूत करण्यासाठी पिंजून काढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.