राजगड : शेतकऱ्याच्या मुलीला त्यांच्याच शेतामध्ये जीवंत गाडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातल्या राजगड तालुक्यातील कोंढावळे येथे ही घटना घडली आहे.
राजगड तालुक्यातील कोंढावळे खुर्द येथे जमिनीच्या वादातून एका शेतकर्याच्या एकवीस वर्षीय मुलीला जेसीबीच्या सहाय्याने शेतात गाडण्याचा प्रयत्न करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून याबाबत नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
प्रणाली बबन खोपडे ( वय.२१, रा.कोंढावळे खुर्द, ता.राजगड) असे हल्ला झालेल्या तरुणीचे नाव आहे. तरुणी व तिची आई कमल बबन खोपडे यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. मात्र, याबाबत वेल्हे पोलिसांत अद्यापही कोणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी दिली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत तक्रारदार मुलीची आई कमल खोपडे म्हणाल्या, मी आणि माझ्या दोन मुली प्रणाली व प्राजक्ता बुधवारी (ता.२९) कोंढावळे खुर्द येथील गट नंबर ११४ मधील शेतात काम करीत होतो. त्यावेळी संभाजी खोपडे याने या ठिकाणी पंधरा ते सोळा गुंडांबरोबर जेसीबी व ट्रॅक्टर आणून ही जमीन माझ्या नावावर झाली असून तुम्ही या जमिनीत थांबू नका, असे म्हटले. यावेळी माझी मुलगी प्रणाली हिने विरोध केल्याने तिला जेसीबीने ढकलून देत तिच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न केला. घटनेचे गांभीर्य ओळखून कमल खोपडे यांनी वेळीच हस्तक्षेप करीत दुसरी मुलगी प्राजक्ताच्या मदतीने तिच्या अंगावरील माती बाजूला काढून तिला वाचवले. या प्रकरणी प्रणाली व तिची आई कमल यांनी वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून अद्यापही कोणावर गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती वेल्हे पोलिसांकडून मिळाली आहे.
या घटनेमध्ये मुंबई शिवडी येथील कुख्यात गुंड उमेश रमेश जयस्वाल उर्फ राजू भैय्या घटनास्थळी उपस्थित होता. त्याने या ठिकाणी दहशत निर्माण करून जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तसेच संबंधित मुलीला गाडण्याचा प्रयत्न करत दुसर्या महिलांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी वेल्हे पोलिस दखल घेत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आज गुरुवार (ता.३०) रोजी कमल बबन खोपडे व प्रणाली खोपडे यांनी पुणे अधीक्षक कार्यालय येथे धाव घेतली. याबाबत वेल्ह्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ म्हणाले, या प्रकरणी दोन्ही बाजूकडून तक्रार अर्ज दाखल झाले असून योग्य तो तपास करून चौकशी अंती गुन्हे दाखल करण्यात येतील.