राजगड : राजगड तालुक्यातील कोंढावळे खुर्द येथील जमिनीच्या वादातून 21 वर्षीय तरुणीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न झाला.या प्रकरणात आरोपींवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असला, तरी जमिनीचा ताबा घेताना वेल्हे पोलीस उपस्थित होते. ही बाब लपवण्यात आल्याबद्दल प्रचंड रोष नागरिकांमध्ये दिसत आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रशक्ती संघटनेने केली आहे.
काय आहे प्रकरण ?
राजगड तालुक्यातील कोंढावळे खुर्द येथील शेतकऱ्याच्या मुलीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली होती. याप्रकरणी तक्रारदार तरुणी व तिच्या आईची वेल्हे पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतल्यावर अखेर शुक्रवारी (ता. ३१) चार जणांसहित इतर दहा ते बारा अनोळखी व्यक्तींवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी?
धरणग्रस्तांचे पुनर्वसन, धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतजमिनींच्या मोबदल्यात हक्काच्या जमिनी, जमिनींचे वितरण या संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद असल्यामुळे पुनर्वसनाच्या जमिनी माफियांनाच पोसण्यासाठीच वितरीत केल्या जात असल्याची स्थिती असल्याचा आरोप राष्ट्रशक्ती संघटनेचे संस्थापक माऊली दारवटकर यांनी करून या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. वेल्हे पोलिस स्टेशनच्या या पोलिसांची नावे जाहीर करून लँड माफियांसोबत तिथे पोलिसांना उपस्थित राहण्याचे आदेश देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांना तात्काळ निलंबित करा -दारवटकर
घटनास्थळी शासकीय बंदोबस्त असेल तर जर तिथे पोलीस असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. तर पोलिसांवर कारवाई का झाली नाही? त्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा” अशी मागणी राष्ट्रशक्ती संघटनेचे अध्यक्ष दारवटकर यांनी केली आहे. “वेल्हे पोलिसांची भूमिका व कारवाई अत्यंत संशयास्पद असून या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे. “पुनर्वसनाच्या जागा कवडीमोल भावात शेतकऱ्यांकडून घेऊन पुनर्वसन अधिकाऱ्यांना हाताशी धुरून पुण्याच्या आजूबाजूला प्राईम लोकेशनला जागांचे स्वतःसाठी सरकारकडून वाटप करून घेण्याचे हजारो प्रकार वेल्ह्यात घडले आहेत. संपादित जमिनीचा मोबदला न देता शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेणे हा शिवरायांच्या राजगड तालुक्यातील शासनाने शेतकऱ्यांवर चालवलेला अन्याय आहे.” अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
संघटनेकडून पीडित कुटुंबाची भेट
संघटनेकडून पीडित कुटुंबाची भेट घेण्यात आली. संबंधित मुलीच्या पायांना सूज आली असून हे कुटुंब कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये गेल्याचे समजल्यानंतर संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी पोहोचले व मुलगी प्रणाली बबन खोपडे व तिच्या कुटुंबीयांची विचारपूस करून त्यांना आधार दिला. “हे प्रकरण अत्यंत गंभीर असून भोर-वेल्ह्यात गुन्हेगारीला थारा देणार नाही. या प्रकरणात पोलीस प्रशासन कोणाला पाठीशी घालत आहे? एका पोलीस महिलेच्या पतीचा या प्रकरणात काय सहभाग आहे? याची चौकशी झालीच पाहिजे, कुणालाही पाठीशी घातले गेले तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा ईशारा संघटनेचे सचिव शहाजी आरसुळ यांनी दिला आहे.
यावेळी संघटनेचे रामभाऊ मांढरे, प्रमोद आरसुळ, विजय धुमाळ, रविकांत भुरूक, शिवाजी धिंडले आदी उपस्थित होते.