सांगली : सांगलीतील वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे पैशांच्या देवाण घेवाणीतून एकावर गोळ्या झाडण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत ज्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पांडुरंग शिंदे असे या घटनेत मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते शेतकरी होते. त्यांचा काही जणांसोबत पैशांच्या देवाण घेवाणीवरुन वाद सुरू होता. आज सकाळी पांडुरंग आपल्या शेतात (ऊस) आले असता, त्यावेळी त्या ठिकाणी काही जण त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी दबा धरुन बसले होते. हल्लेखोरांनी पांडुरंग यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर हे हल्लेखोर तेथून पळून गेले. पांडुरंग शिंदे यांना रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांचा खून पैशांच्या देवाणघेवाणीतून झाला असल्याची चर्चा असली तरी त्यांच्या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.
कासेगावपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर पांडुरंग शिंदे यांची शेती आहे. हा परिसर निर्मनुष्य आहे, यामुळे कोणीही प्रत्यक्षदर्शी नाही. त्यामुळे खुनाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह पथक कासेगावमध्येच तळ ठोकून आहेत. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके देखील विविध ठिकाणी रवाना करण्यात आली असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे सांगली शहर हादरले आहे.