भोरः राधाकृष्ण गार्डन मंगल कार्यालय, कात्रज-नवले पूल रस्ता आंबेगाव बुद्रुक पुणे येथे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रहिवासी नागरिकांचा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच या कार्यक्रमात आमदार संग्राम थोपटे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते. थोपटे यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागत त्यांनी केलेले सर्व आरोपी फेटाळून लावले. तसेच उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली.
नाना पटोले, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणारः थोपटे
आघाडीचे जागा वाटप अद्यापर्यंत अधिकृत जाहीर झाले नसले तरी भोरमधून आमदार संग्राम थोपटे यांना चौथ्यांदा संधी दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर थोपटे यांनी २४ अॅाक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा या कार्यक्रमात केली. तसेच अर्ज भरण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित असणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आरोप
विरोधकांकडून निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सातत्याने आरोप केले जात आहेत. भोर एमआडीसबद्दल काही जण व्यक्तव्य करीत आहेत, त्या भागात कसा रोजगार उपलब्ध होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. तुमच्या नावावर जागा आहेत, तर मग तुम्ही का देत नाही, असा खरा सवाल असल्याचे थोपटे यावेळी म्हणाले. तसेच एकीकडे जागा द्यायची नाही आणि एमआयडीसी मंजूर करीत नाही म्हणून विरोध दर्शवायचा प्रयत्न करण्याचे काम सुरू असल्याचे थोपटे म्हणाले. २४ अॅाक्टोबरला अर्ज भरणार असून, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भोरला फार्म भरण्यासाठी येणार आहे. तसेच खा. सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे सचिन अहिर हे देखील उपस्थित असणार असल्याची माहीती थोपटे यांनी दिली.
थोपटे परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न
माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. आता माझ्या पत्नीचा आणि मुलाचा देखील विरोधकांकडून नामउल्लेख होताना दिसत आहे. विकासा बद्दलचा कोणताही अंजेडा त्यांच्याकडे नसून केवळ थोपटे कुंटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न असल्याचे थोपटे यावेळी म्हणाले. चुकीचा गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न काही मंडळीनी जाणीवपूर्वक करीत असल्याचा आरोप त्यांनी विरोधकांवर केला आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग चव्हाण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मानसिंगबाबा धुमाळ, भोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे, भोर पंचायत समितीचे मा. सभापती बाळासाहेब थोपटे, वंदना धुमाळ, लहुनाना शेलार, मा. उपसभापती रोहन बाठे, मा. जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, गीतांजली आंबवले, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, नगरसेवक बाळासाहेब धनकवडे, काकासाहेब चव्हाण, राजगड सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन पोपटराव सुके, संचालक उत्तमराव थोपटे उपस्थित होते.
तसेच मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती धनंजय वाडकर, भोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदा आंबवले, उपसभापती ईश्वर पांगारे, सा. कार्यकर्ते अनिलनाना सावले, माऊली दारवडकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अतुल किंद्रे, व्हा.चेअरमन अतुल शेडगे, संचालक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पावर पक्ष कार्याध्यक्ष संदीप नांगरे, रोहिदास जेधे, महिला अध्यक्षा विद्याताई यादव, युवक अध्यक्ष गणेश खुटवड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे जिल्हा युवती अध्यक्ष दुर्गा चोरघे, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह कार्यकर्ते, भोर तालुक्यातील पुणे स्थित रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.