भोर : देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास , देश सेवा, राष्ट्रभक्ती, स्वाभीमान या त्यांच्या कलागुणांची वस्तूस्थिती विद्यार्थ्यांना कळायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजायला हवी, यासाठी टिटेघर (ता.भोर) येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांनी केंद्रप्रमुख अंजली वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांच्या सहकार्याने शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल देशमाने, सहशिक्षिका भाग्यश्री सुर्वे, नफिसा नागुलकर यांच्या मार्फत राख्या बनवून ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबवून रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून या राख्या मंगळवार (दि.६) वाघा बॉर्डर, जम्मू काश्मीर, लडाख या देशांच्या सीमेवर शुभेच्छा पत्रांसह पाठवल्या. जवळपास ५०० हुन अधिक राख्या पाठवण्यात आल्याचे अध्यक्ष केळकर यांनी सांगितले.
देशाच्या सीमेवर आपल्या कुटुंबाची पर्वा न करता डोळ्यात तेल घालून आपले सर्वांचे रक्षण करत असणा-या सैनिकांसाठी आपण राख्या तयार करतोय हे समजल्यावर आम्हाला खूप अभिमान वाटत आहे ,आम्ही या राख्या उत्साहाने, आनंदाने , प्रेमाने ,मायेने बनवून पाठवत आहोत ,भारतमातेच्या या वीर सुपुत्रांच्या हातात रक्षाबंधनाच्या निमित्ताने आमच्या राख्या बांधल्या जाणार असल्याने आम्ही खूप भाग्यवान असल्याचे विद्यार्थिनींनी बोलून दाखवले.
सैनिकांना आपल्या गावात कधी कुठले सणं-उत्सव होतात, याची माहिती असली तरी देशबांधवांच्या संरक्षणाचे भान, कर्तव्याशी बांधील राहून सीमेवर तैनात असतात. विद्यार्थ्यांनी बनवून पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचे आत्मबल वाढेल. रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची संधी या उपक्रमातून विद्यार्थ्यांनाही मिळेल असे राजीव केळकर यांनी सांगितले. सैनिक युद्धांसह नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीतही देशवासीयांना मदत करतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम घेतला. विद्यार्थ्यांनी स्वतः राखी तयार केल्याने त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळाला. शिवाय मुलांच्या सृजनशीलतेला चालना मिळाली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रभक्ती अधिक रूजावी यासाठी हा उपक्रम राबविल्याचे तालुका केंद्रप्रमुख व मुख्याध्यापिका यांनी सांगितले.