खेड शिवापूर: पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ते खेड शिवापूर टोलनाका दरम्यान रस्त्यावरील दुभाजक विनापरवानगी तोडले असल्याची माहिती मिळत असून, यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकाराकडे एन. एच. ए. आय, रिलायन्स इन्फ्रा व राजगड पोलीस दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा येथील जनमानसांत होताना दिसत आहे. त्यामुळे आता कोणतीही परवानगी न घेता तोडलेले दुभाजक यांच्यावर कारवाई होणार का, तसेच येथे पुन्हा दुभाजक लाववण्यात येणार का असे प्रश्न येथील नागरिक विचारू लागले आहेत.
तेरी भी चूप, मेरी भी चूप
पुणे-सातारा मुख्य रस्त्यावरील दुभाजक काही व्यावसायिकांनी हेतूपूर्वक तोडलेले आहेत. यामुळे सेवा रस्त्यावरून जाणारे वाहन सेवा रस्त्याला येताना व मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्याला येताना मोठा अपघात होऊ शकतो हे नाकारता येत नाही. तोडलेले दुभाजक बंद करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, या मागणीकडे कोणीही लक्ष देत नसून तेरी भी चूप, और मेरी भी चूप असे दिसत असून एन एच ए आय, रिलायन्स इन्फ्रा, व पोलीस प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.
ज्या ठिकाणी विनापरवानगी दुभाजक तोडले आहेत, त्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस संरक्षण मिळणे आवश्यक आहे. आम्ही संयुक्त कारवाईसाठी पत्रक दिले असून केवळ पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई करता येत नाही
-खेड शिवापूर टोलनाक्यावरील रिलायन्स इंफ्राचे व्यवस्थापक अमित भाटिया
आम्हाला पत्र दिले असले तरी कारवाईसाठी चर्चा करणे गरजेचे आहे. रिलायन्स इंफ्राच्या अधिकारी वर्गाने आमच्याशी चर्चा केली, तर निश्चितच आम्ही संरक्षण दिले जाईल.
-राजगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी