नसरापूर: कर्जत-जामखेड येथे होणाऱ्या ६६ व्या राज्य अजिंक्यपद आणि प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे आयोजन नसरापूर येथे करण्यात आले आहे. पुणे जिल्हा तालीम संघाच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संलग्नतेने ही स्पर्धा ८ आणि ९ मार्च रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी दत्तामामा भरणे,क्रीडामंत्री व मकरंद पाटील,पुनर्वसनमंत्री तसेच सुनेत्रवहिनी पवार ,खासदार यांची उपस्थिती असणार आहे.
या स्पर्धेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, पुणे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. अमोल बुचडे,पै.स्वप्नील कोंडे , अभिषेक खोपडे, राजेंद्र सोनवणे, प्रशांत दाणवले, लालू आप्पा कोंडे तेजस पायगुडे, पै शंभू कोंडे ,शशिकांत शिंदे उपस्थित होते.
ही निवड चाचणी स्पर्धा वरिष्ठ व कुमार अशा दोन गटांत पार पडणार असून, एकूण ३० वजन गटांमध्ये कुस्तीगीर आपले नशीब आजमावतील. वरिष्ठ गटात मॅट आणि माती अशा दोन्ही प्रकारांत प्रत्येकी १० गट आहेत. विशेषतः महाराष्ट्र केसरी गटातील स्पर्धा ८६ किलोपासून १२५ किलो वजन गटांमध्ये होणार आहे. कुमार गटात ४१ ते ११० किलो या वजन गटांमध्ये कुस्ती लढती रंगतील.
स्पर्धेतील विजेत्यांना विशेष बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रत्येक वजन गटातील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या पैलवानाला सायकल, प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी प्रदान केली जाईल, तर उपविजेत्याला प्रशस्तीपत्रक आणि ट्रॉफी दिली जाईल.
स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्र केसरी गटातील अंतिम माती आणि मॅट कुस्तीतील विजयत्यामधील अंतिम लढत. या स्पर्धेतील विजेत्याला पै. विक्रम पारखी यांच्या स्मरणार्थ “चांदीची गदा” आणि “पुणे जिल्हा केसरी” किताब देण्यात येणार आहे. तसेच, कुमार गटाच्या ११० किलो गटातील अंतिम विजेत्यास स्व. पै. अक्षय कोंडे यांच्या स्मरणार्थ “चांदीची गदा” आणि “पुणे जिल्हा कुमार केसरी” किताब प्रदान केला जाणार आहे.
स्वप्नील कोंडे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आमदार शंकरभाऊ मांडेकर आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भालचंद्रभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडेल. अध्यक्षपदाची जबाबदारी पै. अमोल बुचवडे सांभाळणार आहेत.
या निवड चाचणीतून विजयी ठरलेले पैलवान कर्जत-जामखेड येथे महाराष्ट्र केसरी किताबासाठी स्पर्धेत उतरतील. त्यामुळे कुस्तीप्रेमींसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची आणि रोमांचक ठरणार आहे.