नसरापूरः येथील भागात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले असून, याबाबत महावितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, आधिकाऱ्यांनी दिलेल्या तोंडी आश्वासनानंतर सदर आंदोलन हे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा तसेच येणाऱ्या दिवाळी सारख्या ऐन हिंदूंच्या मुख्य सणांच्या वेळी वीज पुरवठ्याचे तीन तेरा वाजले असून, वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नसरापूर ते वेल्हा तालुका परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत.
विशेष म्हणजे याबाबत विचारणा केली असता महावितरणाच्या नसरापूर कार्यालयामधील अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांबरोबर उद्धट व असभ्य वर्तन करीत आहेत. यामुळे नसरापूर भागातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या महावितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकून अधिकाऱ्यांना काळे फास आंदोलन करण्यात येणार होते.
परंतु, या कार्यालयातील अधिकारी नवनाथ गाठोळे यांनी दिलेल्या तोंडी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे माजी सभापती लहूनाना शेलार, विशाल कोंडे, दादा आंबवले, आत्माराम वाल्हेकर, सागर वाल्हेकर, विशाल कामठे, रणजित बोरगे, सोपान कोंडे, अभिजित भोरडे, आनंदा खुडे, पांडुरंग खुटवड, रामदास थिटे, नितीन रसाळ, नारायण पांगारकर, अमोल हजारे, प्रशांत वाल्हेकर, किरण शेलार, राज पांगारकर तसेच या भागातील युवक उपस्थित होते.
येत्या दोन दिवसांत कंन्डटरचा प्रोब्लेम सोडवला जाईल. या विषयीच्या सूचना कर्मचारी अधिकारी यांनी दिलेल्या आहेत. याचा कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. गेल्या दोन दिवसांमध्ये पाऊस झाल्याने तसेच वाऱ्यांमुळे वीजपुरवठा काही भागात खंडीत होत होता. तो आम्ही दुरुस्त केलेला आहे. मात्र, कंन्डटर बदलणे बाकी आहे, ते येत्या दोन दिवसांत बदलले जाईल.
-नवनाथ घोटाळे महावितरण अधिकारी
अधिकाऱ्यांनी तोंडी आश्वासन दिलेले आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे काही लोकं आली होती. त्यांनी सांगितले की, कायदा हातात घेऊ नका. या ठिकाणी चर्चा करण्यात आली. खरंतर गेल्या तीन महिन्यांमध्ये वेळोवेळी वीज जात आहे, यामुळे ग्रामीण भागात असलेल्या गावातील नागरिकांचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होत होता. त्या अनुषंगाने वेळोवेळी विनंती करून देखील याकडे लक्ष दिले जात नव्हते. यामुळे ग्रामस्थांच्या आग्रहाखातर हा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला. महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून युद्ध पातळीवर काम करण्याची हमी दिली आहे. येत्या आठ दिवसांत समस्येची सोडवणूक झाली नाही, तर यापेक्षाही मोठे आंदोलन महावितरणाच्या मुळशी कार्यालयाबाहेर छेडले जाईल.
– लहूनाना शेलार मा. सभापती पंचायत समिती भोर