नसरापूर: राजगड पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेले पोलीस हवालदार राहुल बाळकृष्ण कोल्हे यांच्यावर काल रात्री हल्ला झाला आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी रोहन गौतम साळवे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार कोल्हे हे रात्री 10:15 ते 10:25 च्या दरम्यान खेडशिवापूर येथील पोलीस चौकीमध्ये कर्तव्यावर होते. त्यावेळी आरोपी रोहन साळवे हा शिवी घालत आणि रागाच्या भरात चौकीत घुसला. त्याने हवालदार कोल्हे यांच्यावर हल्ला करून त्यांच्या डोक्यात खुर्ची मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात हवालदार कोल्हे जखमी झाले आहेत.याचबरोबर, आरोपीने चौकीमधील संगणकावर खुर्ची फेकून त्याचे नुकसान केले.
यामुळे सुमारे ५०,००० रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.हल्ल्यानंतर हवालदार कोल्हे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. यानंतर आरोपी रोहन साळवे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 307, 353, 332 आणि 37(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत.