भोर: भोर तालुक्यातील पसुरे (ता.भोर) येथे जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी कर्नल हितेश सिंग यांना पुणे येथील अॅडिशनल सेशन कोर्टाने जामीन नाकारला आहे. यामुळे आरोपी सिंग यांचा येरवडा कारावासाचा कालावधी वाढला आहे.
गेल्या बारा दिवसांपूर्वी, भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील परिसरात पसुरे येथे जमिनीच्या वादातून एका फार्महाऊसचा मालक कर्नल हितेश सिंग यांनी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी हवेत दोन वेळा गोळीबार केला होता. या प्रकरणी भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आरोपीला अटक करण्यात आली होती.
सिंग यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीमध्ये विजेचे खांब उभारल्याने वाद निर्माण झाला होता. या वादात अशोक गेनबा बिऱ्हामणे, प्रकाश तुकाराम शेलार, शंकर दिनकर बिऱ्हामणे, सोनबा कोंडीबा बिऱ्हामणे आणि चंद्रकांत कुरंगवडे हे शेतकरी सिंग यांना भेटायला गेले होते. या भेटीदरम्यान दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि यानंतर सिंग यांनी शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी हवेत दोन गोळ्या झाडल्या होत्या.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सिंग यांना ताब्यात घेतले आणि त्यांना भोर पोलीस ठाण्यात आणले. नंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सिंग हे सध्या येरवडा कारागृहात आहेत.