जिल्हा नियोजन सदस्य मोठे की मुख्यमंत्री मोठे, या गोष्टीचे भान आमदार महोदयांना हवे होते- बाळासाहेब चांदेरे
मुळशी : भोर, वेल्हे, मुळशी विधानसभा मतदारसंघात विकास कामांच्या श्रेयवादावरून आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू झाला आहे. मुख्यमंत्र्याच्या सूचनेनुसार ५ कोटी रुपयांचा निधी भोर विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी मंजूर झाला. प्रशासकीय मान्यतेनंतर लवकरच कामे सुरू होतील. मात्र, तेथेच आमदारांची नाराजी चालू झाली.५ वर्षे शांत राहिलेले आमदार अचानक जागे झाले व त्यांना जिल्हा नियोजन समिती आठवली. जिल्हा नियोजन सदस्य मोठे की मुख्यमंत्री मोठे, या गोष्टीचे भान आमदार महोदयांना हवे होते,” अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी केली.
जिल्हा नियोजन समितीअंतर्गत मुळशी तालुक्यातील विविध विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. आपल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी या कामांना मंजुरी दिली होती, असे चांदेरे यांनी सांगितले होते. मात्र, आमदार संग्राम थोपटे यांनी, ‘ते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत का?’ असा प्रश्न उपस्थित केला होता.
याबाबत चांदेरे यांना प्रत्यूत्तर दिले. ते म्हणाले, ”मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे हे स्वतः नगरविकास मंत्री आहेत. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत व ‘पीएमआरडीए’अंतर्गत निधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मंजूर करतात, हे कदाचित आमदारांना माहीत नसेल. मात्र, आमदार महोदयांनी मंजुरी न घेता नारळ फोडण्याचा पराक्रम मतदारसंघात सर्वत्रच केला आहे. जेथे ५० कामे मंजूर करून आणलीत, तेथे २०० कामे दाखविण्याचा प्रकारसुद्धा व नारळ फोडण्याचा प्रकार देखील आमदारांनी केला आहे. हे त्यांच्या नैतिकतेला शोभणारे आहे का?”