मुळशीः भोर विधानसभेसाठी आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी कंबर कसली असून, या विधानसभा क्षेत्रातील विविध गावांना भेट देत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. युतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी देखील प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मांडेकर यांच्या प्रचाराच्या शुभारंभाला विशेष उपस्थिती दर्शवली. लाडकी बहिण योजनेमुळे महिलांना मोठे आर्थिक पाठबळ उभे राहिले आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम महायुती सरकार करीत असून, शंकर मांडेकर या युतीचे उमेदवार म्हणजेच तुमच्या भावाची साथ द्या, असे आवाहन चाकणकर यांनी यावेळी बोलताना केले.
सगळ्या गोष्टी पुराव्यासहित मांडणारः चाकणकर
भोर-राजगड-मुळशी विधानसभेतील महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभात रुपाली चाकणकर बोलत होत्या. जे पंधरा वर्ष या भागाचे नेतृत्व करत आहेत, त्यांनी या भागाचा विकास केला नाही. त्यांना साधे रस्ते देखील करता आलेले नसल्याची टीका त्यांनी केली. यामुळे महायुती सरकारने लोककल्याणकारी योजना आणल्या. विरोधक या योजना बंद करण्यासाठी कोर्टात धाव घेत आहेत. पण, लोककल्याणकारी योजना बंद होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रायरेश्वरचा भूखंड कोणी गिळलाय, डोंगरी परिषदेच्या आर्थिक व्यवहाराचे काय झाले, राजगड कारखान्याचे काय झाले, दत्त दिगंबर वाहतूक संस्थेे काय झाले, हे सगळे पुराव्यासहित तुमच्या पुढच्या सभेत मांडणार असल्याचे चाकणकरांनी स्पष्ट केले.
तुम्ही संधी द्या, मी सोनं करतोः मांडेकर
विद्यमान आमदार गेली पाच वर्ष मतदार संघात आले नसल्याची टीका शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांच्यावर केली. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर मिळाला पाहिजे. मी सर्व सामान्य कार्यकर्त्याकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. तुम्ही संधी द्या, मी सोनं करतो, असे आवाहन शंकर मांडेकर यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर, मा. आमदार शरद ढमाले, मा. नगरसेवक बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशी तालुका अध्यक्ष अंकुश मोरे, कालिदास गोपलघरे, चंद्रकांत भिंगारे, अमित कंधारे, राजाभाऊ हगवणे राजाभाऊ वाघ, धैर्यशील ढमाले, श्रीकांत कदम, विनोद कंधारे, विजय कानगुडे, विजय यनपुरे, चंद्रकांत भिंगारे, बाळासाहेब सणस, अशोक कांबळ माऊली कांबळे, आकाश वाघ, प्रकाश वाघ, दिनेश कंधारे, सुनिल कदम, संतोष कंधारे, विजय कानगुडे, सचिन अमराळे, राजेंद्र बांदल, आनंद घोगरे, लव्हु चव्हाण, दशरथ महाराज मानकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.