भोरः राज्यात विधानसभेसेची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांनी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवायला सुरूवात केली आहे. भोर विधानसभेत देखील असेच चित्र पाहिला मिळत आहे. भोर-वेल्हा(राजगड)-मुळशी तालुक्यातील नागरिकांना फराळ वाटपाचा कार्यक्रम काही दिवासांपूर्वी पार पडला. या कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा करीत भाजपचे किरण दगडे यांनी नागरिकांना मोफत फराळ वाटप करून भोर विधानसभा निवडणूक लढविण्यावर प्रबळ दावेदारी केली होती. वास्तविक या भागातील अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. केवळ निवडणूक जवळ आली म्हणून नागरिकांना प्रलोभने देऊन भोळवण केली जात असल्याचा प्रकार होत आहे. यामुळे इथल्या मतदारांत नाराजीचा सूर उफाळून आल्याचे पाहिला मिळत आहे.
फराळ वाटपाच्या कार्यक्रमात ‘एक’ गोष्ट नडली
भोर विधानसभेच्या रणांगणात तीन चेहरे एकमेकांना भिडणार असल्याचे चित्र सध्या आहे. यामुळे भोरकरांच्या आणि या विधानसभेत येणाऱ्या ४ लाखांच्यावर मतदारांच्या मताला किंमत आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. दगडे यांच्या फराळ वाटप कार्यक्रमात काही राजकीय वक्तव्य करताना त्यांच्याच एका कार्यकर्त्याची जीभ घसरली. प्रस्थापित नेत्यांवर खालच्या शब्दांत टीका करणे त्या कार्यकर्त्यांना आणि परिणामी हा कार्यक्रम किरण दगडे यांनी आयोजित केल्याने सर्वकाही अंगलट आले होते. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. थोपटे यांनी देखील या फराळ वाटपाच्या कार्यक्रमावर जनतेला प्रलोभने देऊन मते मिळविण्याचा प्रकार असल्याचे सांगितले होते.
नागरिकांना मोफत वस्तूंचे प्रलोभन
दगडे यांनी तालुक्यातील नागरिकांसाठी यात्रांचे आयोजन करून तीर्थक्षेत्र दाखवली. तसेच गावागावात आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबीर पार पडले. मात्र, इथली बेराजगारी हटले का, नागरी समस्यांची सोडणूक झाली का, दुर्गम अशा वेल्हा तालुक्यातील गावांचा विकास झाला का, असे एक ना एक प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे केवळ निवडणुका जवळ आल्या म्हणून नागरिकांना भुलविण्याच्या आणि त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना विसर पाडण्याचे काम सुरूआहे. महिलांना आकर्षित करण्यासाठी आकर्षण वस्तू त्यांना मोफत मिळत आहेत. महिलांच्या हाती निवडणूक आहे असे दाखवले जात आहे. एकप्रकारचा नॅरिटिव्ह तर सेट केला जात नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यावेळी एखादी गोष्टी आपण एखाद्या व्यक्तीला मोफत देतो. त्यावेळी त्याचे मोल त्याला कळत नाही. त्याच्यासाठी ती वस्तू मोफतच असते. यामुळे नागरिकांच्या हाताला काम या भागाचा सर्वांगिक विकास होणे अत्यंत गरजेचे आहे.
हाताला काम मिळणे आवश्यक
भोर-वेल्हा-मुळशी हे तिन्ही तालुक्यांना मोठ्या प्रमाणावर निसर्गिक सानिध्य लाभलेले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा संपूर्ण भाग आहे. या तालुक्यांची आर्थिक स्थिती बेताची असून तालुक्यात म्हणाव्या अशा मोठ्या औद्योगिक कंपन्या नसल्याने येथील तरुण पुणे, मुंबई, बारामती, सातारा अशा ठिकाणी कामासाठी जात आहे. तालुक्यात एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच चर्चेत राहिला आहे. अजूनही चर्चिला जात आहे. मात्र हा प्रश्न सुटणार कधी अशी आस लावून येथील तरूण आहेत. त्यामूळे जनतेला सध्या फूकटची सवय व मोफतचे साहित्य घेण्यातच अधिक आनंद मिळत असल्याचे चित्र आहे.
‘या’ सुविधा मिळणे गरजेच्या
भोर तालुक्यात एआयडीसी होणे अत्यंत गरजेचे असून, यामुळे इथला तरूण बाहेरगावी कामासाठी वणवण भटकणार नाही. तसेच तालुक्यात झालेली रस्त्याची दुर्दशा खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, वीजे प्रवाह खंडीत होण्याची समस्या, अपुरा पाणीपुरवठा, अवैध धंद्याना मिळणारे अभय, अवैध पद्धतीने होणारी प्रवासी वाहतूक, महिलांच्या सुरक्षतेच्या प्रश्न, विद्यार्थ्यांसाठी एसटीची मिळणारी अपुरी सुविधा असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत असून, त्याची सोडणूक होणे गरजेचे असल्याचे येथील नागरिक सांगत आहे. मात्र, या सर्वांकडे दुर्लक्ष करून मोफत साहित्य वाटपाचे पेव फुटलेले आहे.