भोर/पुरंदरः पुणे शहराला अगदी लागून असलेले दोन महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ म्हणजे भोर(वेल्हा, मुळशी) आणि पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघ. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्हीही मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहिला मिळत आहे. अनेकांनी निवडणुकीला सामोरा जाण्याचा पवित्रा घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ३० अॅाक्टोबर रोजी आलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. या छाननीमध्ये अर्जासोबत एबी फॅार्म नसल्याने काहींचे अर्ज बाद करण्यात आले आहे. या दोन्ही मतदार संघात दोन सगळ्यांनाच मोठा धक्का देणाऱ्या गोष्टी घडल्या. भोरमधून ऐनवेळी राष्ट्रवादीकडून शंकर मांडेकरांचे नावे जाहीर करण्यात आले. तर इकडे पुरंदरमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले संभाजीराव झेंडे यांनी राष्ट्रवादीकडून एबी फॅार्म देण्यात आला. या गोष्टींमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
४ तारेखेला चित्र स्पष्ट होणार
भोरमध्ये शिवसेना उमेदवार आघीडीच्या उमेदवारासमोर तगडे आव्हान उभे करेल असा उमेदवार देणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र अजित दादांनी राजकीय खेळी करीत उबाठा गटातील आयात उमेदवाराला आयत्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात धाडले आहे. पुरंदरमध्ये युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे विजय शिवतारे यांच्या नावावर शिक्का मोर्तेब झाला होता. अचानक झेंडे यांना राष्ट्रवादी पक्षाचा एबी फॅार्म देण्यात आला. यामुळे येथे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे सध्याच्या परिस्थितीला अनुसरून बोलले जात आहे. यामुळे दादांनी दोन मतदार संघात दिलेले धक्कातंत्र अनेकांना विचार करायला लावणारे आहे. येत्या ४ तारेखला अर्ज माघारी घेण्याचा दिवस असल्याने खरी राजकीय स्पष्टता त्या दिवशी सर्वांसमोर खुली होईल.
भोर आणि पुरंदरमध्ये ‘या’ समस्यांचा घेराव, सोडवणूक कधी?
भोरमध्ये रस्ते, सुविधा आणि बेरोजगारी हे मुद्दे अत्यंत महत्वाचे मानले जातात. या मतदार संघात येणाऱ्या दुर्गम भागातील जनतेकडे लक्ष दिले जात नसल्याने इथल्या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. मतपेटीत ते काय करताता हे पाहणे अत्यंत महत्वाचे असणार आहे. तर पुरंदर-हवेली मतदार संघ हा ग्रामीण आणि शहरी भागाने वेढलेला आहे. या ठिकाणची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तसेच परगावावरून तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातून कामानिमित्त वास्तव्य करणारा वर्ग येथे आहे. वाढत्या शहरीकरणामुळे अनेक समस्या नागरिकांना भेडसाविताना दिसत आहे.
नाराजांची मनधरणी करण्यासाठी ‘चार दिवस’
दोन्ही मतदार संघातील एकमेकांना लढती देणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कामाला लागलेली आहे. असे असले तरी दिवाळी सण असल्याने त्याचा फारसा परिणाम नागरिकांवर होणार नाही. याचे कारण म्हणजे दिवाळीमुळे नातेवाईकांच्या भेटीगाठी, प्रवास आदी गोष्टींमुळे त्यात सगळे दंग असणार आहेत. मात्र याच काळात नाराज होऊन बंडखोरी केलेल्या अनेकांची समजूत काढण्साठी पक्षातील बड्या नेत्यांना वेळ मिळणार आहे. त्यांची मनधरणी करण्यात बड्या नेत्यांना यश येणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.