जेजुरीः अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत अर्थातच जेजुरीचा खंडोबा. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मल्हारगडावर भाविक येत असतात. वर्षाभरात अनेक सण उत्सव गडावर मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यामध्ये प्रामुख्याने दसरा हा सण जेजुरी गडावर आणि गावात मोठ्या थाटात साजरा केला जातो. या दसऱ्याला जेजुरीचा मर्दानी दसरा असे संबोधले जाते. कैक वर्षांपासून या दिवशी देवाची पालखी निघते. हा पालखी सोहळा डोळ्यात साठवून ठेवणारा असतो. दरवर्षी दसरा आली की त्याच्या अगोदर गावातील प्रसिद्ध छत्र मंदिरात गावातील लोकांसमवेत बैठक घेतली जाते. या बैठकीमध्ये या दिवशी कशा प्रकारे नियोजन करण्यात येणार आहे. याची माहिती दिली जाते.
शेडा दिल्यानंतरच पालखी सोहळा होतो मार्गस्थ
या दिवशी खंडोबा नवा गड आणि कडेपठार जुना गड या ठिकाणाहून दोन्ही पालख्या निघतात. ज्या वेळी हा पालखी सोहळा निघणार आहे, त्यावेळी शेडा दिला जातो. या शेड्यानंतरच पालखी सोहळ्याला सुरूवात होते. रात्रभर चालणाऱ्या मर्दानी दसऱ्याला जेजुरीत अनन्यसाधण महत्व आहे. या दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त गडावर खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. या दिवशी सकाळपासून गडावर भाविकांची गर्दी व्हायला सुरूवात होते. हळूहळू गर्दी वाढत जाते. सायंकाळच्या सुमारास मंदिरांच्या गडकोट आवारात आणि गडाच्या सज्ज्यावर भाविकांची खूप मोठी गर्दी असते. सायंकाळच्या शेडा दिल्यानंतर पालखीत उत्सवमूर्तींना विराजमान करण्यात येते. भंडारा खंडोबऱ्याची मुक्त उधळण पालखीवर करण्यात येते. मंदिराच्या गडकोट आवारातून पालखीची प्रदक्षिणा होऊन पालखी सोहळा मंदिराच्या बाहेर येतो. यानंतर डोंगरामार्गे रमण्याच्या दिशेने मार्गस्थ होतो.
रमणा म्हणजे काय?
कडेपठावर जुन्या गडावरून देखील अशाच प्रकारे देवाच्या पालखी सोहळ्याला सुरूवात होते. डोंगरावरील खडतर पायवाटेने कडेपठारचा पालखी सोहळा मार्गस्थ होता. सगळ्यात खडतर ही पायवाट मानली जाते. मधरात्री दीड दोनच्या सुमारास रमाण्याच्या ठिकाणी नव्या गडावरील पालखी येते. तर कडेपठावर गडावरील पालखी डोंगराच्यावर असते. या ठिकाणी दोन्ही पालख्यातील देवभेट करण्यात येते. या ठिकाणाला रमणा असे म्हटले जाते. ही देवभेट होत असताना मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर भाविक असतात. त्यांच्यासाठी चहा, नाष्ट्याची सोई करण्यात येते. या वेळी होणारी देवभेट आणि त्यावेळी करण्यात येणारी फटाक्यांची आतिषबाजीचे दृष्य आपल्या मोबाईच्या कॅमेऱ्यात तिथे उपस्थित असणारे अनेक जण टिपतात.
सोनं लुटण्याचा कार्यक्रम
डोंगरावरील कडेपठारची पालखी मंदिराकडे माघारी येते. तर नव्या गडावरील खंडोबाची पालखी जुनी जेजुरी मार्गे शहरात दाखल होते. त्या अगोदर आपट्याच्या झाडाला सोनं लुटण्याचा कार्यक्रम पार पडतो. जुनी जेजुरीतील अनेक ठिकाणी पालखी दर्शनासाठी थांबते. यानंतर गावातील प्रत्येक मंदिराला पालखी टेकवली जाते. पहाटे पाच सहा वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा उभी पेठे मार्गे पुन्हा गडावर दाखल होतो.
खंडा तोलणे व कसरत
या दसऱ्याला मर्दानी दसऱ्या म्हणण्याच्या सर्वांत मुख्य कारण म्हणजे गडावर आयोजित केली जाणारी खंडा(तलवार) स्पर्धा. साधारण ४२ किलो वजनाची या तलावरीला खंडा असे म्हटले जाते. पानसे घराण्याने ही तलवार भेट दिली आहे. खंडा हातामध्ये तोलून धरणे आणि खंडा कसरत अशा दोन भागात ही स्पर्धा घेतली जाते. खंडा किती वेळ एका हातामध्ये तोलून धरली जाते, यावर विजेता घोषित केला जातो. तर कसरतीमध्ये खंडा कसरत केली जाते. यात प्रामुख्याने वेगवेगळी प्रकार आहेत. दातामध्ये खंडा धरणे, दोन्ही हाताने खंडा फिरवणे आदी प्रकार केले जातात. सगळ्यात महत्वाचे यासाठी दररोज गडावर सराव केला जातो.