भोरः भोर विधानसभेत महायुतीचे शंकर मांडेकर यांनी मा. आमदार संग्राम थोपटे यांचा १९ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. या विधानसभा क्षेत्रात भोर-राजगड आणि मुळशी या तीन तालुक्यांचा समावेश होतो. मांडेकर यांच्या विजयाचे श्रेय हे मुळशी तालुक्याला मिळते. याचे कारण म्हणजे मतदानाची आकडेवारी पाहता मांडेकर यांच्यासाठी मुळशी तालुका गेमचेंजर ठरला आहे. या तालुक्यातून मांडेकर यांना तब्बल ८१ हजार ७४९ मते मिळाली आहेत, तर थोपटे यांना २८ हजार ३७५ मते मिळालेली आहेत. मात्र, इतर दोन तालुक्यांची आकडेवारी पाहता मा. आमदार संग्राम थोपटे यांचे पारडे जड असल्याचे आकडेवारी सांगते.
दोन तालुक्यात महाविकास आघाडीचीच सरशी
थोपटे यांना भोर आणि राजगड या दोन्ही तालुक्यात अनुक्रमे ५७ हजार ९५०, २० हजार २२ मते मिळालेली आहेत. यामुळे थोपटे यांच्या वाट्याला पराभव आला असला तरी त्यांचे या दोन्ही तालुक्यात वर्चस्व कायम असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. यामुळे महाविकास आघाडीचे पारडे मुळशी तालुका वगळता इतर दोन्ही ठिकाणी असल्याचे दिसते. यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मतांची आकडेवारी पाहता भोर आणि राजगड तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणांमध्ये सर्वच ठिकाणी महाआघाडीला मतदारांनी पसंती दिल्याचे दिसून येते. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीला या दोन्ही तालुक्यात लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. भोर आणि राजगड तालुक्यातील मतदारांनी मतदानरुपी महाविकास आघाडीला कौल दिला आहे. म्हणजेच मा. आमदार संग्राम थोपटे यांना पसंती दिली आहे. या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होऊन सरासरी ६८ टक्के मतदान झाले. यामुळे गतवर्षीपेक्षा सरासरी ५ ते ६ टक्क्यांची वाढ झाली. या वाढलेल्या मतदानाचा फायदा मांडेकरांना तर तोटा थोपटे यांना झाला असल्याचे दिसते.