भोरः राज्यात महायुतीची सत्ता येणार असं भाकित एक्सिट पोलने वर्तवलं होतं. ते खरं ठरलं पण इतक्या मोठ्या आकड्यांनी महायुतीचे उमेदवार विजयी होतील याची कोणालाही अंदाज नव्हता. दोन अशे एक्सिट पोलचा अंदाज होता की राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल तर दुसऱ्या पोलमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी समप्रमाणात जागा मारतील. मात्र तसं काही झालंच नाही. उलट पुन्हा एकदा एक्सिट पोल फोट ठरले असल्याचे दिसले. राज्यातील काही हाय व्होल्टेज आणि चुरशीच्या लढतीपैकी एक लढत होती. ती म्हणजे भोर विधानसभेची. या मतदार संघात निवडणुकीच्या अगोदर मोठ्या प्रमाणावर नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत. महाविकास आघाडीकडून मा. आमदार संग्राम थोपटे यांना संधी देण्यात आली. तर दुसऱ्या बाजूला महायुतीचा उमेदवार कोण? यासाठी बरेच दिवस गेले. मोठ्या प्रमाणावर खलंबत झाली. यातच भाजपकडून इच्छुक असलेले किरण दगडे आणि शिंदेसेनेकडून इच्छुक असलेले कुलदीप कोंडे यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली. अचानक महायुतीचा उमेदवार म्हणून शंकर मांडेकर यांना उमेदवारी दिली. फार कमी वेळ असतानाही शंकर मांडेकरांनी भोर विधानसभेची मैदान मारलं आहे.
आयात केलेले उमेदवारच ठरले जायंट किलर
महायुतीच्या उमेदवाराबाबत कोणाचे नाव येणार याची उत्सुकता अनेकांना लागली होती. राष्ट्रवादी (अजित पवार) यांना या जागेवर दावा करीत उमेदवार देण्याचे ठरवले. दादांनी उमेदवारांबाबत चाचपणी केल्यानंतर अचानक शिवसेना उबाठा गटातील शंकर मांडेकर यांना उमेदवारी जाहीर केली. मांडेकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर अनेकांच्या भुवय्या उंचावल्या. मांडेकर हे आयात उमेदवार आहेत, अशी टीका देखील त्यांच्यावर करण्यात आली. मात्र, आयात उमेदवारानेच सगळ्यांना घाम फोडत विजयाचा गुलाल उधळून ते जायंट किलर ठरले आहेत.
मांडेकरांनी सुरूवातीपासूनच घेतली होती आघाडी
भोर विधानसभेच्या झालेल्या चौरंगी निवडणुकीत महायुतीचे राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) उमेदवार शंकर मांडेकर यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांचा १९९०५ अधिक पोस्टलचि २०३ मते अशा एकूण २० हजार १०८ मतांनी दारून पराभव करून भोर विधानसभा मतदार संघात इतिहास घडवून मतदार संघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीत शंकर मांडेकर यांनी सुरूवातीपासूनच आघाडी घेतली होती. एकूण २४ मतमोजणी फेऱ्यांमध्ये मांडेकर यांनी ५३ हजार मताःपर्यंत आघाडी घेतली होती. शेवटच्या फेरीत एकूण २ लाख ९१ हजार ७०४ मतांपैकी १ लाख २6 हजार २५२ मते त्यांनी मिळवली. तर संग्राम थोपटे यांना १ लाख ६ हजार ३४७ अधिक पोस्टली ४५० मते मिळाल्याने भोरचे निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. विकास खरात यांनी शंकर मांडेकर यांना विजयी घोषित केले.
थोपटेंचा विजयी चौकार हुकला
मा. आमदार संग्राम थोपटे यांनी भोर विधानसभेची तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे. मात्र, काही प्रलंबित प्रश्न जसे की भोर एमआयडीसी, साखर कारखाना आदी प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने येथील मतदारांमध्ये त्यांच्याविषयी नाराजीचा सूर होता. हा नाराजीचा सूर मतदारांना मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केल्यामुळे संग्राम थोपटे यांचा विजयी चौकार हुकला आहे.
मांडेकरांचा इतिहास काय सांगतो?
शंकर मांडेकर हे सुरुवातीला शिवसेना उद्धव बाळासाहेब गटात होते. त्याच्याहीअगोदर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत होते. उमेदवारी मिळाल्याने मांडेकरांनी ऐन निवडणुकीच्या काळात आपल्या हाती घड्याळ बांधले आणि ते इथून आमदार म्हणून निवडून आले.